राहुलकुमार अवचट
यवत : कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभाग पुणे व सुभाष बाबुराव कुल महाविद्यालय, केडगाव (ता. दौंड) यांच्या संयुक्त विद्यमाने सुभाष बाबुराव कुल महाविद्यालय येथे आयोजित पंडीत दीनदयाल उपाध्याय रोजगार मेळाव्यात १०४ उमेदवारांची निवड करण्यात आली.
रोजगार मेळाव्याच्या उद्घाटनप्रसंगी दौंडचे आमदार राहुल कुल, कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता व नाविन्यता विभागाचे सहायक आयुक्त सचिन जाधव, परिविक्षाधिन सहायक आयुक्त सागर मोहिते, सुभाष बाबुराव कुल महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. नंदकुमार जाधव उपस्थित होते.
रोजगार मेळाव्यासाठी २२३ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. त्यापैकी उपस्थित १० उद्योजकांनी रोजगार मेळाव्याच्या ठिकाणी उमेदवारांच्या मुलाखती घेतल्या आणि १०४ उमेदवारांची निवड केली. या मेळाव्यात बारावी उत्तीर्ण, पदवीधर, आयटीआय उत्तीर्ण विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला.
यावेळी प्राचार्य डॉ. जाधव यांनी उपस्थित कंपनी प्रतिनिधींना महाविद्यालयाशी सामंजस्य करार करण्याचे आवाहन करून महाविद्यालयातून प्रशिक्षित मनुष्यबळ निर्माण करण्यासाठी उद्योगक्षेत्राने पुढाकार घ्यावा, असे सांगितले. यावेळी जाधव यांनी नोकरीच्या संधीची माहिती दिली.