पुणे : पुण्यात अपघाताच्या घटनांत वाढ होताना दिसत आहे. अशातच आता कात्रज परिसरातील गुजरवाडी फाट्याजवळ जाधवनगरमध्ये भरधाव ट्रकने दुचाकीला जोरदार धडक दिली. या धडकेत सहप्रवासी महिलेचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. तर या अपघातात दुचाकीस्वारासह ४ वर्षांचा मुलगा जखमी झाला आहे. ही घटना कात्रज परिसरात घडली आहे.
काजल अरविंद धेंडे (वय-२३) असे मृत्युमुखी पडलेल्या महिलेचे नाव आहे. तर अथर्व अरविंद धेंडे (वय-४) हा गंभीर जखमी झाला आहे. या प्रकरणी दुचाकीस्वार अरविंद धेंडे (वय-३०, रा. मांगडेवाडी, कात्रज) यांनी भारती विद्यापीठ पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यावरून ट्रकचालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. महादेव भगवान कांबळे (वय-३२, रा. हांडेवाडी, हडपसर) असे गुन्हा दाखल केलेल्या ट्रक चालकाचे नाव आहे.
पोलिसांनी दिलेल्या अधिक माहितीनुसार, रविवारी रात्री आठच्या सुमारास अरविंद त्यांची पत्नी काजल आणि चार वर्षांच्या मुलासह दुचाकीवरून निघाले होते. कात्रज परिसरातील गुजरवाडी फाट्याजवळ जाधवनगरमध्ये भरधाव ट्रकने दुचाकीला पाठीमागून जोरदार धडक दिली. या अपघातात काजल आणि मुलगा अथर्व हे दोघे गंभीर जखमी झाले. त्यांना रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं. मात्र, उपचारादरम्यान काजल यांचा मृत्यू झाला. पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक मोहन देशमुख करीत आहेत.