लोणी काळभोर : यशवंतराव चव्हाण कला क्रीडा सांस्कृतिक महोत्सव २०२३-२०२४ अंतर्गत आयोजित केलेल्या केंद्रस्तरीय शालेय क्रीडा स्पर्धा लोणी काळभोर (ता. हवेली) येथील जिल्हा परिषद शाळा व पृथ्वीराज कपूर हायस्कूलमध्ये मंगळवारी (ता. ५) मोठ्या उत्साहात पार पडल्या. या स्पर्धेत विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला होता.
केंद्रस्तरीय शालेय क्रीडा स्पर्धेचे उद्घाटन लोणी काळभोरचे सरपंच योगेश काळभोर व हवेली पंचायत समितीचे माजी उपसभापती सनी उर्फ युगंधर काळभोर यांच्या हस्ते करण्यात आले. या वेळी लोणी काळभोरच्या उपसरपंच प्रियंका काळभोर, पृथ्वीराज कपूर हायस्कूलचे प्राचार्य सीताराम गवळी, केंद्रप्रमुख राजेंद्र जगताप, पोलीस पाटील लक्ष्मण काळभोर, क्रीडा शिक्षक कोरे आदी मान्यवर उपस्थित होते.
क्रीडा स्पर्धेत धावणे, उंच उडी, लांब उडी, वक्तृत्व स्पर्धा, कबड्डी, खो-खो, भजन, लोकनृत्य, लेझीम, प्रश्नमंजुषा, थाळीफेक, गोळा फेक आदी खेळांचा समावेश होता. या स्पर्धेमध्ये लोणी काळभोर केंद्रातील १४ जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला होता. या स्पर्धेतील विजेत्या खेळाडू व संघाला नवनाथ पानमंद, दिगंबर सुपेकर, प्रिती कामठे, नजमा तांबोळी, चित्रा गवारे, तुषार चौधरी, निलोफर शेख, महेश पवार, सुनील जाधव, सचिन कराड, दत्ता मेमाणे व शेंडकर या शिक्षकांचे बहुमूल्य मार्गदर्शन मिळाले.
दरम्यान, स्पर्धेतील विजेता खेळाडू, संघ व मार्गदर्शक शिक्षकांचे केंद्रप्रमुख राजेंद्र जगताप यांनी अभिनंदन केले. तसेच विजेत्या स्पर्धकांना प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात आले. सर्व विद्यार्थ्यांना खाऊ वाटप करून कार्यक्रमाची सांगता झाली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रोहिदास मेमाणे यांनी केले.