पुणे : मध्य रेल्वे प्रशासनाने धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त प्रवाशांची होणारी अतिरिक्त गर्दी लक्षात घेऊन मुंबई, पुणे आणि नागपूर आणि नागपूर-भुसावळ-नाशिक रोड दरम्यान विशेष गाड्या चालवण्याचा निर्णय घेतला आहे. लोकमान्य टिळक टर्मिनस ते नागपूर अनारक्षित विशेष गाडी ११ ऑक्टोबर रोजी मुंबई लोकमान्य टिळक टर्मिनस येथून दुपारी २ वाजता सुटणार आहे. पुणे-नागपूर अतिजलद विशेष गाडी पुणे येथून ११ ऑक्टोबर रोजी दुपारी ४ वाजता सुटेल.
नागपूर-लोकमान्य टिळक टर्मिनस विशेष गाडी नागपूर येथून १२ ऑक्टोबर रोजी रात्री १० वाजून ५ मिनिटांनी सुटणार आहे. नागपूर-पुणे अनारक्षित विशेष गाडी १२ ऑक्टोबर रोजी नागपूर येथून रात्री ११ वाजता सुटणार आहे. नागपूर-लोकमान्य टिळक टर्मिनस विशेष गाडी १३ ऑक्टोबर रोजी नागपूर येथून रात्री १२ वाजून २० मिनिटांनी सुटणार आहे. भुसावळ-नागपूर-नाशिक रोड मेमू विशेष गाडी १२ ऑक्टोबर रोजी भुसावळ येथून पहाटे ४ वाजून २५ मिनिटांनी सुटणार आहे. तर मेमू विशेष गाडी १२ ऑक्टोबर रोजी नागपूर येथून रात्री ११ वाजून ४० मिनिटांनी सुटणार आहे.