पुणे : दिल्लीत ९८ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनासाठी पुणे ते दिल्ली विशेष रेल्वेची व्यवस्था करण्याच्या सूचना रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या आहेत. याकरिता केंद्रीय हवाई वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी पुढाकार घेत रेल्वेचा प्रश्न मार्गी लावला.
दिल्लीत २१, २२ आणि २३ फेब्रुवारी रोजी साहित्य संमेलन होणार आहे. सरहद, पुणे ही संमेलनाची आयोजक संस्था आहे. सरहदकडून विशेष रेल्वे सेवेसाठी रेल्वे मंत्रालयाकडे पत्रव्यवहार करण्यात आला होता. परंतु रेल्वे मंत्रालयाकडून सकारात्मक प्रतिसाद मिळत नसल्याचे सरहदकडून सांगण्यात आले. मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळाल्यानंतर पहिलेच संमेलन दिल्लीत होत आहे. त्यामुळे भव्यदिव्य स्वरूपात संमेलन करण्याचा निर्धार आयोजकांनी केला आहे. यापूर्वी पंजाबच्या घुमान येथे झालेल्या संमेलनाला तत्कालीन रेल्वेमंत्र्यांनी दोन रेल्वे गाड्यांची व्यवस्था केली होती.
दरम्यान, रेल्वेमंत्र्यांकडून प्रतिसाद मिळत नसल्याचे लक्षात येताच ही बाब मुरलीधर मोहोळ यांच्या लक्षात आणून देण्यात आली. मोहोळ यांनी रेल्वमंत्र्यांशी चर्चा करीत रेल्वे गाडीची व्यवस्था करण्याची विनंती केली. या विनंतीला मान देत कार्यवाही करण्याच्या सूचना वैष्णव यांनी अधिकाऱ्यांना देण्यात आल्या आहेत.