पुणे : पुणे शहरातील एका खासगी रुग्णालयाकडून शहरी गरीब योजनेतील फसवणुकीनंतर पुणे महानगरपालिकेच्या प्रशासनाला जाग आली आहे. शहराच्या कार्यक्षेत्रातील खासगी हॉस्पिटल्स/नर्सिंग होम्स/रुग्णालये यांना दि बॉम्बे नर्सिंग होम अॅक्ट १९४९ मधील तरतुदीनुसार पालिकेकडे नोंदणी करण्याचे आवाहन केले आहे. त्याचबरोबर शहरातील रुग्णालयांच्या तपासणीसाठी खास ड्राईव्ह घेतला जाणार आहे. पुणे पालिकेकडून महाराष्ट्र शुश्रूषागृहे नोंदणी नियम २०२१ शासन अधिसूचनेनुसार नर्सिंग होमची वर्षातून दोन वेळा म्हणजेच दर सहा महिन्यातून एकदा तपासणी करण्यात येते. याकरिता तपासणी सूची तयार केलेली आहे.
तपासणी करण्याकरिता क्षेत्रीय कार्यालयस्तरावर क्षेत्रीय वैद्यकीय अधिकारी यांची नेमणूक करण्यात आलेली आहे. क्षेत्रीय वैद्यकीय अधिकारी यांना तपासणी करतेवेळी आढळून आलेल्या त्रुटीबाबत संबंधिताना तोंडी अथवा लेखी सूचना करण्यात येतात. महाराष्ट्र नर्सिंग होम अधिनियमांतर्गत नोंदणीकृत रुग्णालयांची तपासणी करण्यासाठी उपसंचालक आरोग्य सेवा, पुणे मंडळ, पुणे यांनी दिलेल्या सूचना व आदेशानुसार पुणे मनपा कार्यक्षेत्रातील नोंदणीकृत रुग्णालयांची तपासणी विशेष मोहीम (स्पेशल ड्राईव्ह) राबविण्यात येणार आहे.