राजू देवडे
लोणी धामणी : आंबेगाव तालुक्याच्या सातगाव पठार भागात व पूर्व आंबेगावातील शिरदाळे-लोणी धामणी परिसरात ज्वारीचे पीक बहरले आहे. यंदा पठार भागात व पूर्व आंबेगावात परतीचा पाऊस व गारपीट मोठ्या प्रमाणात झाल्याने ज्वारीसह इतर पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. या अस्मानी संकटातून वाचलेल्या पिकाला सध्या बहर आला आहे. मात्र, पुरेशा प्रमाणात लागवड न झाल्याने, आगामी काळात ज्वारी व कडब्याचा मोठ्या प्रमाणात तुटवडा जाणवणार आहे.
ज्वारीचे कोठार अशी ओळख असलेला आंबेगावचा सातगाव पठार व पूर्व भाग सध्या पांढऱ्या शुभ्र रब्बी ज्वारीच्या पिकाने बहरला आहे. सततच्या दुष्काळी स्थितीनंतर यंदा बहरलेल्या ज्वारी पिकामुळे शेतकऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण आहे.
रब्बी हंगामातील सर्वच पिके जोमात
बहरलेल्या पिकात ज्वारीचे दाणे खाण्यासाठी पाखरांचा वावर वाढत आहे. शेतकऱ्यांना पिकांची राखण करण्यासाठी अधिक मेहनत घ्यावी लागत आहे. मात्र, मजुरीचे दर गगनाला भिडल्यामुळे शिवाय शेतीमालाला बाजारपेठेत अपेक्षित दर मिळत नसल्यामुळे शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे. यंदा पाण्याची स्थिती चांगली असल्यामुळे ज्वारीसह गहू, हरभरा, करडी ही पिके हिरवीगार व जोमदार असून, हरभरा फुलोऱ्यात तर ज्वारी हुरड्यात आली आहे.
जिल्ह्यात यंदा सर्वत्र रब्बीची पिके बहरली आहेत. अशा स्थितीत विविध पक्षी या पिकांवरील कणसांकडे आकर्षित होत असून, दाणे टिपून आपली भूक भागविण्याचा प्रयत्न करीत आहेत. कोवळे दाणे टिपायला मिळत असल्याने यंदा शिवारांमध्ये पक्ष्यांचा वावर वाढलेला दिसत आहे. बहुतेकांकडून बुजगावण्यांसह विविध क्लुप्त्या वापरून शेतीसाठी राखण करण्याचा प्रयत्न सुरू आहे. नंतरच्या पावसाने शिरदाळे येथील शेतकऱ्यांना दिलासा मिळाला असून, त्यामुळे जनावरांच्या कडब्याचा प्रश्न सुटला आहे. रानातील चारा देखील अजून हिरवा असल्याचे माजी उपसरपंच मयूर सरडे यांनी सांगितले.