इंदापूर : इंदापूर आणि परिसरात जनाधार असणाऱ्या सोनाई डेअरीच्या प्रविण माने यांचा पाठिंबा कुणाला? याची राजकीय वर्तुळात होत होती. आज रविवारी (दि.7 ) पत्रकार परिषद घेत याबाबत स्पष्ट भूमिका मांडली. आपण अजित पवारांसोबत असल्याचं माने यांनी स्पष्टपणे सांगितल्याने बारामती लोकसभा मतदारसंघात शरद पवारांसह सुप्रिया सुळे यांना मोठा धक्का बसला आहे.
बारामती लोकसभा मतदारसंघात धुमश्चक्री सुरू आहे. माने कुटुंब नेहमीच पवार कुटुंबासोबत राहिलं आहे. आता राज्याच्या राजकारणात अनेक बदल झाले. अजित पवारांचे हात बळकट करुन त्यांची ताकद वाढवण्यासाठी इंदापूर तालुक्याच्या विकासासाठी उभं राहण्याचा निर्णय घेतला आहे. आम्ही आजित पवारांसोबत आहोत, असे प्रविण माने यांनी यावेळी जाहीर केले.
ते पुढे म्हणाले, राज्याच्या विकासासाठी अजित पवार हे भाजपसोबत गेले आहेत. आम्ही त्यांच्या मार्गदर्शनाखाली काम करत आहोत. आता प्रचार सुरू होणार आहे. आजपासून आम्ही प्रचार सुरू करणार आहोत. 8 दिवसांपूर्वी लोकसभा मतदारसंघात सुनेत्रा पवार यांची उमेदवारी जाहीर झाली. सुनेत्रा वहिनीचं मोठं सामाजिक काम राहिलेलं आहे. पण वहिनी कधी प्रकाशझोतात आलेल्या नाहीत. आता मात्र त्या राजकारणत आलेल्या आहेत. त्यांना निवडून आणण्यासाठी आम्ही प्रयत्न करू, असेही प्रविण माने यांनी सांगितले.
अजित पवार म्हणजे खमके नेते आहेत. ते सकाळी ६ वाजता कामाला सुरुवात करतात. शब्दाला पक्के असे दादा आहेत. बारामतीनंतर इंदापूर तालुक्यात कामं सुरू आहेत. दादा इंदापुरात आले होते. काही व्यापाऱ्यांनी निवेदन दिलं होतं. विकास कामे अजित दादाच करू शकतात. म्हणून आम्ही निर्णय घेतला आहे की, दशरथ माने आणि इतर कुटुंबीय अजित पवारांच्या पाठिशी उभे राहणार असल्याचे प्रविण माने यांनी सांगितले.