(Somatane Toll ) पुणे : सोमाटणे टोलनाक्यावर राज्यातील सर्व कार आणि मावळातील वाणिज्य वाहनांना सवलत देण्याचे आश्वासन सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांनी सोमाटणे टोलनाका हटाव कृती समितीला दिल्यांनतर बेमुदत उपोषण मागे घेण्यात आले आहे. पुणे-मुंबई महामार्गावरील सोमाटणे टोलनाका कायमस्वरुपी हटविण्यात यावा, या मागणीसाठी तळेगाव दाभाडे येथील जोशी वाडीतील विठ्ठल मंदिरात शनिवारी (ता. ९) दुपारपासून बेमुदत उपोषणास बसले होते.
सोमाटणे टोलनाका हलविण्याचा निर्णय…!
सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांनी आंदोलनस्थळी पोचले. आंदोलनकर्त्यांना संबोधित करताना विधानसभेचे अधिवेशन संपल्यानंतर मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांच्या उपस्थितीत बैठक घेऊन, सोमाटणे टोलनाका हलविण्याचा निर्णय घेण्यात येणार असल्याचे आश्वासन दिले. तोपर्यंत सर्व मोटारीला सवलत तर मावळातील स्थानिक वाणिज्य वाहनांना पथकरात सवलत देण्याचे आश्वासन चव्हाण यांनी दिले. त्यानंतर चव्हाण यांनी किशोर आवारे यांना फळाचा रस पाजून उपोषण सोडले.
टोल नाका परिसरात सर्वपक्षीय नेते आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने एकवटले होते. सोमवारी (ता. १३) रात्री अचानक निर्णय होऊन, सोमाटणे टोलनाका हटाव कृती समितीचे कार्यकर्ते जमा होणार असल्याने पिंपरी-चिंचवड पोलिसांनी मंगळवार (ता. १४) सकाळपासूनच मोठा बंदोबस्त तैनात केला होता. वडगाव मावळ ते निगडी दरम्यान मुंबई-पुणे महामार्गावरील वाहतूक दुतर्फा बंद करण्यात आली होती.
याबाबत भाजप जिल्हाध्यक्ष गणेश भेगडे म्हणाले, ‘‘या अनधिकृत टोलनाक्याच्या माध्यमातून रस्त्याच्या खर्चासाठी आठशे कोटी वसुली करणे गरजेचे असताना संबंधित विभागाने अडीच हजार कोटी रूपये वसूल केले. शिवाय टोलवसुलीची मुदत २०३० पर्यंत वाढवली. हे नियमबाह्य असल्याने तो तात्काळ बंद करावा. अन्यथा आंदोलनाची व्याप्ती वाढवणार.’’
दरम्यान, शिवसेना तालुका प्रमुख राजू खांडभोर, ‘आरपीआय’चे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष सूर्यकांत वाघमारे, यांनी मनोगत व्यक्त केले. आंदोलनात बाळासाहेब घोटकुले, बाळासाहेब नेवाळे, गणेश काकडे, नितीन घोटकुले, भारत ठाकूर, राकेश मु-हे, संतोष दाभाडे, आदींसह मोठ्या संख्येने आंदोलनकर्ते उपस्थित होते.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा…!