दीपक खिलारे
इंदापूर : भारतातील वंचित, गरीब व पीडितांच्या प्रश्नांची सोडवणूक करुन त्यांना त्यांचे हक्क, अधिकार प्रदान केले तरच बाबासाहेबांना महापरिनिर्वाणदिनी खऱ्या अर्थाने आदरांजली ठरेल, असे वक्तव्य भारत मुक्ती मोर्चाचे कार्याध्यक्ष नानासाहेब चव्हाण यांनी केले.
मातोश्री रमाबाई आंबेडकर विद्यार्थी वसतिगृह ट्रस्ट संचलित भिमाई आश्रमशाळा तसेच मुलांचे व मुलींचे अनुदान वसतिगृह यांच्या संयुक्त विद्यमाने महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या ६७ व्या महापरिनिर्वाण दिनी त्यांना अभिवादन करण्यात आले. त्यावेळी नानासाहेब चव्हाण बोलत होते.
सर्वोत्तम भूमिपुत्र तथागत गौतम बुद्ध, डॉ. बाबासाहेब आंबेडकर तसेच इंदापूरचे माजी नगराध्यक्ष, संस्थेचे तत्कालीन दिवंगत अध्यक्ष रत्नाकर मखरे (तात्या) यांच्या प्रतिमांना इंदापूरच्या माजी नगरसेविका, संस्थेच्या अध्यक्षा शकुंतला मखरे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. या वेळी कार्यक्रमस्थळी बुद्ध वंदना घेण्यात आली.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनावर विद्यार्थ्यांनी भाषणे व गीते सादर केले. उत्कृष्ट भाषण करणाऱ्या विद्यार्थ्यांना पुस्तके भेट दिली. या कार्यक्रमास संस्थेचे सचिव अॅड. समीर मखरे, संचालक गोरख तिकोटे, हनुमंत कांबळे, रवी चव्हाण तसेच प्राथमिक आश्रमशाळेचे मुख्याध्यापक साहेबराव पवार, माध्यमिक, उच्च माध्यमिक आश्रमशाळेच्या प्राचार्या अनिता साळवे तसेच विद्यार्थी, शिक्षक, प्राध्यापक, अधिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आदी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन हिरालाल चंदनशिवे यांनी केले.