लोणी काळभोर : पुणे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरून थेऊरकडे जात असताना कुंजीरवाडी (ता. हवेली) ग्रामपंचायत हद्दीतील रेल्वे उड्डाण पुलावर छोटे-मोठे अनेक अपघात झालेले आहे. या अपघातांत काही नागरिकांना आपला जीव गमवावा लागला आहे. तर काहींना आपले अवयव गमावून कायमस्वरूपी अपंगत्वसुद्धा आलेले आहे. या रेल्वे उड्डाणपुलावर होणारे अपघात रोखण्यासाठी व नागरिकांच्या सुरक्षेच्या दृष्टीकोनातून सोलर लाईट स्टड व फ्लेक्सिबल स्प्रिंग पोस्ट बॅरियर बसविण्यात आले आहेत, अशी माहिती कुंजीरवाडीचे सरपंच हरेश गोठे यांनी दिली.
थेऊर फाटा येथील रेल्वे उड्डाणपुलावर शनिवारी (ता. ३०) कुंजीरवाडी ग्रामपंचायतीच्या वतीने सोलर लाईट स्टड फ्लेक्सिबल स्प्रिंग पोस्ट बॅरियर बसविण्यात आले आहेत. या वेळी ग्रामपंचायत कर्मचारी बबलू शेलार, भरत आळंदकर, अक्षय फरतडे आदी मान्यवर उपस्थित होते.
या वेळी बोलताना सरपंच हरेश गोठे म्हणाले की, थेऊर रेल्वे उड्डाणपुलावर बसविलेले सोलर लाईट स्टड हे सौरऊर्जेचा वापर करून आपोआप चार्ज होणार आहेत. रात्रीच्या अंधारात सतत चमकत राहणार आहेत. तर फ्लेक्सिबल स्प्रिंग पोस्ट बॅरियर हे वाहनचालकांचे लक्ष वेधून घेणार व वाहनचालकांना दिशा दर्शक सूचना देण्याचे काम करणार आहेत. त्यामुळे या पुलावरून प्रवास करणाऱ्या नागरिकांना आता रात्रीच्या वेळी पुलावरील कठडे दिसणार आहेत. या पुलावरील अपघातांचे प्रमाण नक्कीच कमी होण्यास मदत होईल.
कुंजीरवाडी ग्रामपंचायतीच्या वतीने या संवेदनशील कामासाठी ४० ते ५० हजार रुपये खर्च केला आहे. गावाच्या विकासासाठी व नागरिकांच्या सुरक्षेच्या दृष्टीकोनातून उपाययोजना करण्यासाठी लागेल तेवढा निधी शासनाकडून उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न करणार आहे. तसेच या रेल्वे उड्डाणपुलावरील कठडे कायमस्वरूपी कसे काढता येतील, यासाठी शासनाकडे पाठपुरावा करणार आहे, असेही सरपंच हरेश गोठे यांनी सांगितले.