Solapur Suicide : सोलापूर : शहरातील प्रसिद्ध उद्योजक आणि मुलतानी बेकरीचे मालक सुनील मोतीलाल सदारंगानी (Sunil Motilal Sadarangani) वय 55 यांनी आत्महत्या (Suicide) केल्याची धक्कादायक घटना समोर आली असून त्यामुळे सोलापूर शहरात खळबळ उडाली आहे. विजयपूर महामार्गावरील पनाश अपार्टमेंटमध्ये गुरुवारी सायंकाळी सुमारे 5 वाजताच्या सुमारास ही घटना घडली. निर्माणाधीन असलेल्या इमारतीच्या 17 व्या मजल्यावरून उडी घेऊन त्यांनी जीवन संपवले. या प्रकरणाची नोंद विजापूर नाका पोलीस ठाण्यात करण्यात आली असून पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे.

पोलिसांना मिळालेल्या माहितीनुसार, आत्महत्येपूर्वीचे सीसीटीव्ही फुटेज समोर आले आहे. त्यामध्ये सुनील सदारंगानी काही वेळ 17 व्या मजल्यावर उभे असल्याचे दिसून येते. त्यांनी हात जोडून प्रार्थना केली, काही काळ शांतपणे उभे राहिले आणि त्यानंतर खाली झोपून इमारतीवरून उडी घेतली. या घटनेत त्यांचा जागीच मृत्यू झाला. मोठा आवाज झाल्याने परिसरातील नागरिक घटनास्थळी जमा झाले.
घटनेची माहिती मिळताच विजापूर नाका पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक दादा गायकवाड, पोलीस निरीक्षक सुशांत वराळे आणि विलास घुगे यांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला. मृतदेह शवविच्छेदनासाठी शासकीय रुग्णालयात पाठवण्यात आला.
सुनील सदारंगानी हे सोलापुरातील प्रसिद्ध मुलतानी बेकरीचे मालक होते. काही वर्षांपूर्वी बेकरी व्यवसाय बंद झाल्यानंतर ते पुण्यात वास्तव्यास होते. पुण्याच्या खराडी भागात ते राहत होते. गेल्या काही वर्षांपासून ते आर्थिक अडचणींचा सामना करत होते. तसेच त्यांच्यावर मानसोपचार तज्ज्ञांकडून उपचार सुरू असल्याची माहिती नातेवाईकांनी पोलिसांना दिली आहे.
चार ते पाच दिवसांपूर्वीच ते पत्नीसह सोलापूरला आले होते आणि पुन्हा येथेच स्थायिक होण्याचा त्यांचा विचार होता. त्यांना दोन मुले असून एक मुलगा अमेरिकेत तर दुसरा पुण्यात व्यवसाय करतो. अमेरिकेत असलेला मुलगा सोलापूरकडे रवाना झाला आहे. त्यानंतर आज, शुक्रवारी सायंकाळी 5 वाजता मोदी स्मशानभूमीत अंत्यसंस्कार होणार आहेत.






