Solapur News : सोलापूर : सोलापूर-विजापूर रस्त्यावरील सैफुल परिसरात झाडाझुडपात एका तरुण जिम ट्रेनरचा मृतदेह (Deathbody) आढळल्याने खळबळ उडाली आहे. सागवानाच्या झाडाला रबरी पाइपने गळफास घेतलेल्या अवस्थेत हा मृतदेह सापडला. सचिन मच्छिंद्र माने (वय 30, रा. विजापूर नाका) असे मृत तरुणाचे नाव असून तो 14 मार्चपासून बेपत्ता होता.
मिळालेल्या माहितीनुसार, सचिन माने हे बॉडी बिल्डर आणि जिम ट्रेनर होते. ते 14 मार्च रोजी घरातून बाहेर पडताना पत्नीला अर्ध्या तासात परत येतो असे सांगून गेले होते. मात्र त्यानंतर ते परतले नाहीत. त्यांच्या कुटुंबीयांनी विजापूर नाका पोलीस ठाण्यात बेपत्ता असल्याची तक्रार नोंदवली होती. त्यांचा मोबाईलही बंद असल्याने शोधमोहीम सुरू होती.
दरम्यान, शुक्रवारी सकाळी सैफुलजवळील काटेरी झुडपात एका झाडाला गळफास घेतलेल्या अवस्थेत मृतदेह आढळला. घटनास्थळी सापडलेल्या मोबाईल आणि इतर वस्तूंवरून तो मृतदेह सचिन माने यांचाच असल्याचे स्पष्ट झाले. या घटनेनंतर त्यांच्या नातेवाईकांनी घटनास्थळी धाव घेतली.
नातेवाईकांनी या प्रकरणात घातपाताचा संशय व्यक्त केला असून एका महिलेसह तिघांवर आरोप केले आहेत. मात्र पोलिसांनी प्राथमिक तपासात गळफासामुळे मृत्यू झाल्याचे सांगितले आहे. मृतदेह शवविच्छेदनासाठी शासकीय रुग्णालयात पाठवण्यात आला आहे.
सचिन यांच्या पश्चात पत्नी, 3 वर्षांची मुलगी आणि दीड वर्षांचा मुलगा असा परिवार आहे. या घटनेमुळे कुटुंबीयांनी शासकीय रुग्णालयात आक्रोश व्यक्त करत न्यायाची मागणी केली आहे. पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे.






