आंबेगाव : विधानसभा निवडणुकीसाठी २० नोव्हेंबरला मतदान, तर २३ नोव्हेंबरला निकाल लागणार आहे. आज निवडणुकीसाठीच्या प्रचाराच्या तोफा थंडावल्या आहेत. शरद पवारांची साथ सोडल्यानंतर दिलीप वळसे पाटील पहिल्यांदा विधानसभा निवडणुकीला सामोरे जात आहेत. अजित पवार यांनी वळसे पाटलांना आंबेगाव विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी दिल्यानंतर शरद पवारांनी त्यांच्याविरोधात देवदत्त निकम यांना रिंगणात उतरवलं आहे. आता मतदानादिवशी जनतेचा कौल कोणाला मिळणार, याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे. अशातच आता राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे उमेदवार दिलीप वळसे पाटील यांनी खुलं आव्हान दिलं आहे.
काय म्हणाले दिलीप वळसे पाटील?
काही लोक म्हणतात अटक होणार होती, काही म्हणतात ईडी आणि सीबीआयची नोटीस आली होती. म्हणून त्यांनी शरद पवारांना सोडून ते दुसऱ्या पक्षात गेले. मात्र, मी यापूर्वी सांगितलेलं आहे. मला ईडी, सीबीआय अथवा अन्य कोणत्या एजन्सीची नोटीस आलेली नाही. जर कोणी त्या संदर्भातील पुरावा आज रात्री नऊ वाजेपर्यंत आणून द्यावा, मी उद्या सकाळी माझी उमेदवारी मागे घेतो, असं आव्हान दिलीप वळसे पाटील यांनी दिलं आहे.
पुढे बोलताना म्हणाले, मी नार्को टेस्टला तयार आहे., त्यांची नार्को टेस्ट केली तर देवदत्त निकमांना तोंड दाखवायला जागा राहणार नाही. विरोधक म्हणतात माझी नार्को टेस्ट करा, बिनधास्त करा. पण माझी ही करा अन देवदत्त निकमांची ही नार्को टेस्ट करा. माझ्या नार्को टेस्टमध्ये काय बाहेर पडेल याची मला कल्पना आहे, मात्र तुम्हाला तर तोंड दाखवायला जागा राहणार नाही, असंही दिलीप वळसे पाटील म्हणाले.