बारामती : मी केलेल्या विकासकामांची मला पावती द्यायची असेल तर या लोकसभेला मी उभा करेन त्या उमेदवाराच्या पाठीशी बारामतीकरांनी खंबीरपणे उभे राहावे, असे आवाहन करत अजित पवार यांनी आज आगामी लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराचे रणशिंग फुंकले.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते विशाल जाधव यांच्या संपर्क कार्यालयाच्या उद्घाटनानिमित्त आयोजित कार्यक्रमात अजित पवार बोलत होते. गेली अनेक वर्षे आपण वरिष्ठांच्या विचारांना मान देत त्यांच्या विचारांच्या उमेदवारांना विजयी केले. यापुढील काळात मात्र अजित पवार हाच लोकसभेचा उमेदवार आहे, असे समजून मी उभा करीन त्या उमेदवाराला विजयी करा, असे आवाहन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शरद पवार यांचे नाव न घेता केला.
या वेळी बोलताना अजित पवार म्हणाले की, यंदाच्या लोकसभेमध्ये मतदारांना भावनिक आवाहन केले जाईल. मात्र, भूलथापांना भुलू नका. ही शेवटची निवडणूक आहे, असे सांगण्याचा प्रयत्न केला तरी भावनिक न होता बारामतीच्या विकासाच्या दृष्टीने कोण उमेदवार विकासाचे प्रकल्प राबवू शकेल, याचा विचार करून बारामतीकरांनी मतदानाचा निर्णय घ्यावा. ही शेवटची निवडणूक असल्याचे सतत म्हटले जाते. मात्र, शेवटची निवडणूक केव्हा होईल, हेच समजत नाही, असा टोलाही त्यांनी लगावला.
लवकरच बारामती लोकसभेचा उमेदवार आपण जाहीर करणार असल्याचे अजित पवार यांनी आज बोलताना स्पष्ट केले. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी व गृहमंत्री अमित शहा यांच्याशी माझे अतिशय चांगले संबंध आहेत. तुमच्या लोकप्रतिनिधीला थेट देशाचे पंतप्रधान चांगले ओळखतात. त्यामुळे आपल्या विचाराचा खासदार निवडून आला तर विकासाची कामे अधिक वेगाने मार्गी लावण्यासाठी मी पंतप्रधानांकडे आग्रह धरू शकेन, असे सांगत अजित पवार यांनी खासदार सुप्रिया सुळे यांचे नाव न घेता त्यांच्यावरही अप्रत्यक्षरीत्या टीका केली. इकडे-तिकडे फिरणारे खासदार नकोत, विकासकामे करणारे खासदार आपल्याला हवेत, असे म्हणत त्यांनी कडाडून टीकास्त्र सोडले.
दरम्यान, अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार याच लोकसभेच्या राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या उमेदवार असू शकतील, अशी चर्चा बारामतीत सुरू झाली आहे.