सासवड : पुरंदर येथील साकुर्डे व पिंगोरी परिसरातून गुटख्यासाठी खैराची तस्करी केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. गुटखा बनवण्यासाठी खैराची मागणी होत असल्याचे सासवडचे प्रभारी वन प्ररिक्षेत्र अधिकारी शिवाजी राऊत यांनी सांगितले. साकुर्डे येथील डोंगरातून खैराची वृक्ष तोड होत असल्याची माहिती शिवसेना भवनला मिळाली. त्या माहितीच्या आधारे युवा सेना जिल्हाप्रमुख तुषार हंबीर व इतर कार्यकर्ते हे साकोर्ड्यात गेले. त्यावेळी त्यांना मोठ्या प्रमाणावर खैराच्या झाडांची तोड होत असल्याचे निदर्शनास आले.
कार्यकर्त्यांना पाहतास झाडाची तोड करणाऱ्या 12 ते 16 जणांनी पळून जाण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी विजय शिवतारे यांनी वरिष्ठ वन अधिकारी यांना फोन करून या प्रकरणाबाबत माहिती दिली. त्यानंतर वनपाल राहुल रासकर व अन्य वन अधिकारी घटनास्थळी दाखल झाले. रात्री त्यादिवशी उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याचे काम सुरु होते.
झाडांची तोड करणाऱ्यांनी राहण्यासाठी एक तंबू देखील उभारला होता. महिनाभर धान्य पुरेल असे भरून ठेवले होते. यासाठी स्थानिकांची चांगलीच मदत असण्याची दाट शक्यता वर्तवण्यात येत आहे. ही वृक्षतोड होत असताना वन विभागाला याचा सुगावा कसा लागला नाही? असा प्रश्न नागरिकांनी उपस्थित केला आहे. त्यामुळे अशी मोठ्या प्रमाणावर खैराच्या झाडांची तोड होत असताना वन विभाग पुरंदरचे हे पूर्णपणे दुर्लक्ष होत असल्याचे दिसून आले आहे. त्यामुळे वन विभागाचा सावळा गोंधळ पुरंदर तालुक्यात दिसून आला आहे.