पुणे : पुणे शहरातील सिंहगड रोड पोलीस ठाण्याच्या हद्दीत उंटांच्या तस्करीचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. कत्तलीसाठी कर्नाटक येथे नेण्यात येणाऱ्या आठ उंटांची गोरक्षकांच्या मदतीने पोलिसांनी सुटका केली आहे. याप्रकरणी पोलिसांनी टेम्पो चालकाला ताब्यात घेतले असून सर्व उंट पुणे पांजरपोळ ट्रस्ट भोसरी येथे सुखरूप सोडले आहेत. ही कारवाई मंगळवारी १४ मे रोजी करण्यात आली.
याबाबत कृष्णा सातपुते यांनी सिंहगड रोड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यावरून अरुण कुमार चिनपापा आणि लखन मगन जाधव यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, पिंपरी चिंचवड येथील रावेत येथून एका टेम्पोमध्ये उंट भरुन कत्तलीसाठी कर्नाटक येथे जाणार असल्याची माहिती गोरक्षक शिवशंकर स्वामी (मानद पशुकल्यान अधिकारी) यांना मिळाली. स्वामींनी तात्काळ सहकारी कृष्णा सातपुते यांना माहिती देऊन सिंहगड रोड पोलिसांच्या मदतीने कायदेशीर कारवाई करण्यास सांगितले.
पोलिसांच्या मदतीने टेम्पो ताब्यात घेऊन पाहणी केली. त्यावेळी टेम्पोत ८ उंट दाटीवाटीने कोंबून भरलेले आढळून आले. उंटांचे चारी पाय व तोंड दोरीने घट्ट बांधलेल्या अवस्थेत होते. त्यामुळे त्यांना जखमा झाल्या होत्या. टेम्पो चालकाकडे चौकशी केली असता सर्व उंट कर्नाटक येथे कत्तलीसाठी घेऊन जाणार असल्याची कबुली त्याने दिली. पोलिसांनी दोघांवर गुन्हा दाखल करुन सर्व उंट पुणे पांजरपोळ ट्रस्ट भोसरी येथे सुखरूप सोडण्यात आले.