चाकण, (पुणे) : हॉटेलमध्ये जेवण करण्यासाठी आलेल्या ग्राहकांमध्ये होम थिएटर सरकावल्याने राडा झालं आहे. होम थिएटर सरकवल्याच्या रागातून दोन गटात तुंबळ हाणामारी झाली आहे. यामधील पाच जणांनी मिळून दोघांना शिवीगाळ करत बेदम मारहाण करून डोक्यात काचेच्या बाटल्या फोडल्या. याप्रकरणी महाळुंगे एमआयडीसी पोलिसांत एका महिलेसह पाच जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
निघोजे (ता. खेड) गावातील हॉटेल स्कायमध्ये शनिवारी १३ जानेवारीला सायंकाळी ही घटना घडली. प्रसाद रामचंद्र येळवंडे (वय २४, रा. निघोजे, ता. खेड) यांनी महाळुंगे एमआयडीसी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार शेखर तुपे, नितीन फलके (दोघे रा. महाळुंगे, ता. खेड), दोन व्यक्ती आणि एक महिला यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी प्रसाद आणि त्यांचा मित्र निघोजे गावातील हॉटेल स्काय येथे जेवण करण्यासाठी गेले होते. प्रसाद हे ज्या टेबलजवळ बसले होते, तिथे हॉटेलमधील होम थिएटर ठेवण्यात आले होते. ते होम थिएटर त्यांनी बाजूला सरकवले. याचा राग मनात धरून शेजारील टेबलवर बसलेल्या आरोपींनी प्रसाद आणि त्यांच्या मित्राला शिवीगाळ केली.
शिवीगाळ करण्यास मज्जाव केला असता आरोपींनी प्रसाद यांच्या डोक्यात काचेच्या बाटल्या मारून खुर्च्यांनी पाठीवर मारहाण करत गंभीर जखमी केले. तसेच आरोपी महिलेने शिवीगाळ करीत जिवे मारण्याची धमकी दिल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. महाळुंगे एमआयडीसी पोलिस अधिक तपास करत आहेत.