उरुळी कांचन : ग्रामविकासात वैविध्यपूर्ण कामगिरी करणाऱ्या सोरतापवाडी (ता.हवेली) ग्रामपंचायतीला २०२१-२२ या वर्षांसाठीचा पुणे जिल्हा परिषदेचा आर. आर. पाटील स्मार्ट व्हिलेज पुरस्कार देऊन गौरविण्यात आले आहे.
राज्यपाल भगत सिंग कोश्यारी यांच्या हस्ते व जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रधान यांच्या प्रमुख उपस्थितीत हा पुरस्कार सोरतापवाडीच्या सरपंच संध्या अमित चौधरी व ग्राम विकास अधिकारी नंदकुमार चव्हाण,संतोष गायकवाड आणि संतोष नेवसे यांनी स्वीकारला. या पुरस्काराचे स्वरूप १० लाख रुपये व सन्मानचिन्ह असे आहे.
पुणे जिल्हा परिषदेकडून स्मार्ट ग्राम योजनेअंतर्गत दिल्या जाणाऱ्या जिल्हा स्मार्ट ग्राम ग्रामपंचायत पुरस्कार देण्यात येतो. मागील तीन वर्षांतील हे पुरस्कार असून, जिल्हास्तरीय पुरस्कारासाठी २०१८-२०१९ इंदापूर तालुक्यातील सपकळवाडी, २०१९-२०२० साठी मावळमधील भोयरे आणि २०२०-२०२१ साठी जुन्नरमधील टिकेकरवाडी या गावांची निवड करण्यात आली आहे.
सोरतापवाडी ग्रामपंचायतीने पाणी पुरवठा, स्वच्छता, आरोग्य,शौचालय निर्मिती, घनकचरा, सांडपाणी निर्मूलन, वृक्षारोपण, संवर्धन, करवसुली, सुविधा, कृषी या सर्व आघाड्यावर काम केले आहे. तसेच पर्यावरण, सौदर्य, आरोग्य संतुलित गावाच्यादृष्टीने ठळक कामे केली आहेत. जिल्हा परिषदेच्या उपमुख्य कार्यकारी अधिकारी सचिन घाडगे, गटविकास अधिकारी अमर माने यांच्या मुल्यांकनात ग्रामपंयातीला स्मार्ट व्हिलेट म्हणून हवेली तालुक्यातून निवडण्यात आले आहे.
दरम्यान, सोरतापवाडी ग्रामपंचायतीने ग्रामविकासासाठी, महिला सक्षमीकरणासाठी व गावाच्या सर्वांगीण विकासासाठी विविध उपक्रम राबविण्यात आघाडीवर आहे. त्यामुळे या वर्षासाठी पुणे जिल्हा परिषदेचा आर. आर. पाटील स्मार्ट व्हिलेज २०२१-२२ पुरस्कारचा सोरतापवाडी ग्रामपंचायतीला देण्यात आला आहे.