बारामती (पुणे) : बारामती तालुक्यातील काऱ्हाटी येथे उभारण्यात आलेल्या उपमुख्यमंत्री अजित पवार, यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांच्या फलकावर अज्ञात समाजकंटकाने शाईफेक केल्याची घटना रविवारी (ता. ११) सकाळी उघडकीस आली आहे. यामुळे परिसरात खळबळ उडाली असून, फलकावर शाई फेकल्याचे लक्षात येताच गावकऱ्यांनी संबंधित फलक काढून ठेवला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, काऱ्हाटीतील एका शेती फार्म मालकाने सुनेत्रा पवार यांचा फलक उभा केला होता. या फलकावर अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांना लोकसभेसाठी प्रचंड मतांनी विजयी करा, या आशयाचा फलक त्यांच्या समर्थकांकडून लावण्यात आला होता. यावर उपमुख्यमंत्री अजित पवार, सुनेत्रा पवार यांचा फोटो होता. या फलकावर रात्रीच्या अंधाराचा फायदा घेऊन अज्ञात व्यक्तींनी शाई फेकली.
दरम्यान, ही घटना सकाळी रस्त्यावरून येणाऱ्या व जाणाऱ्या व्यक्तींच्या निदर्शनास आली. त्यावेळी नागरिकांमध्ये उलटसुलट चर्चांना उधाण आले. या वेळी गावकऱ्यांनी संबंधित फलक काढून ठेवला असून, परिसरात या घटनेचा निषेध केला जात आहे.