पिंपरी: बदलत्या काळानुसार रोजगार निर्मिती आणि शिक्षण क्षेत्रातील आव्हाने वाढत आहेत. त्याला अनुसरून, शहरातील युवकांना रोजगार संधी उपलब्ध व्हाव्यात यासाठी महापालिकेच्या वतीने विविध योजना राबविण्यात येतात. उद्योग क्षेत्रामध्ये कुशल मनुष्यबळाची आवश्यकता आहे. तसेच विद्यार्थी देखील त्यांच्या उत्तम करिअरसाठी प्रयत्नशील आहेत. औद्योगिक क्षेत्र आणि विद्यार्थी यांच्यामधील दुवा म्हणून काम करण्यासाठी महापालिकेच्या वतीने विविध उपक्रम राबविण्यात येतील. पिंपरी चिंचवड शहरामध्ये अनेक महाविद्यालये आहेत. त्यामध्ये संपूर्ण देशभरातील विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. या विद्यार्थ्यांचे भविष्य घडविण्यामध्ये ट्रेनिंग अँड प्लेसमेंट ऑफिसर्सची महत्त्वाची भूमिका आहे, असे प्रतिपादन पिंपरी चिंचवड महापालिकेचे आयुक्त शेखर सिंह यांनी केले.
१६ फेब्रुवारी रोजी ऑटो क्लस्टर, चिंचवड येथे पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे आयुक्त शेखर सिंह यांच्या उपस्थितीत ट्रेनिंग अँड प्लेसमेंट ऑफिसर्स यांचा प्रश्नोत्तरांचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या माध्यमातून उपस्थित अधिकारी यांनी आयुक्तांशी थेट संवाद साधला. यावेळी समाज विकास विभाग प्रमुख अजय चारठाणकर, पीसीएससीएलचे सहमुख्य कार्यकारी अधिकारी किरणराज यादव, मुख्य माहिती तंत्रज्ञान अधिकारी निळकंठ पोमण, क्रीडा विभाग प्रमुख मिनिनाथ दंडवते, विशेष अधिकारी किरण गायकवाड आणि विविध महाविद्यालयांचे ट्रेनिंग अँड प्लेसमेंट ऑफिसर्स, पीसीएमसी स्मार्ट सारथी टीमचे बिनिश सुरेंद्रन, आशिष चिकणे, जस्टीन मॅथ्थू, किरण लवटे आदी प्रतिनिधी उपस्थित होते.
या कार्यक्रमामध्ये ट्रेनिंग अँड प्लेसमेंट ऑफिसर्सनी शहराचा विकास, रोजगार निर्मितीशी संबंधित समस्या व उपाय, त्या संदर्भात भूमिका, इत्यादी विषयांवर विचार मांडले. तसेच, विविध उपस्थित प्रश्नांना आयुक्त शेखर सिंह यांनी समर्पक उत्तरे दिली. विद्यार्थ्यांनी उद्योग क्षेत्राला आवश्यक असणारी कौशल्ये आत्मसात करावीत, महापलिकेच्या वतीने राबविण्यात येणाऱ्या विविध कौशल्य विकास प्रशिक्षणांची माहिती विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवण्यात यावी, जास्तीत जास्त युवकांना रोजगार संधी उपलब्ध व्हाव्यात यासाठी प्रयत्न करण्यात यावेत, विद्यार्थ्यांना इंटर्नशिपची संधी उपलब्ध करून देण्यात यावी, अशा अनेक विषयांवर यावेळी संवाद साधण्यात आला. या कार्यक्रमामध्ये पिंपरी चिंचवड, पुणे आणि मुंबईमधून एकून ८० ट्रेनिंग अँड प्लेसमेंट ऑफिसर्स उपस्थित होते. पीसीएमसी स्मार्ट सारथीच्या वतीने कार्यक्रमाचे प्रास्ताविक करण्यात आले. कार्यक्रमास ट्रेनिंग आणि प्लेसमेंट ऑफिसर्स, विद्यार्थ्यांचा उत्तम प्रतिसाद मिळाला.