पुणे : सुरक्षित प्रवासासाठी एसटी बसला प्राधान्य देण्यात येते. स्वारगेट बस स्थानकात तरुणीवर बलात्काराची घटना घडल्यावर सुरक्षेचा मुद्दा ऐरणीवर आला आहे. या बस स्थानकातील सुरक्षारक्षकांची संख्या कमी आहे. त्यामुळे महिला प्रवाशांच्या सुरक्षेविषयी अनेक प्रश्न उपस्थित झाले होते. स्वारगेट आगार प्रशासनाकडून ३६ सुरक्षारक्षकांची मागणी करण्यात आली आहे. यामध्ये ६ महिला सुरक्षारक्षक नेमण्यात येणार आहे. आधीचे २३ सुरक्षारक्षकांची संख्या अपुरी पडत असल्याने स्वारगेट आगाराने ही मागणी केली आहे. विशेषतः सवलतीमुळे सध्या महिला प्रवाशांची संख्या वाढली आहे.
परंतु, मंगळवारी बलात्काराची घटना घडल्यावर एसटी बसस्थानकातील सुरक्षेची कमतरता असल्याचे दिसून आले. याला एसटी प्रशासन जबाबदार असल्याचे बोलले जात आहे. यामुळे बस स्थानक आणि महिला प्रवाशांच्या सुरक्षेसाठी स्वारगेट प्रशासनाकडून ३६ सुरक्षारक्षकांची मागणी करण्यात आली आहे. याबाबत राज्य रस्ते वाहतूक महामंडळाचे विभाग नियंत्रक प्रमोद नेहूल यांनी सांगितले की, स्वारगेट बसस्थानकातील सुरक्षा वाढविण्यासाठी सुरक्षारक्षकांची संख्या वाढविण्यात येणार आहे. यासंबंधी प्रस्ताव वरिष्ठांकडे पाठविण्यात आला आहे.