लोणी काळभोर : गेली अनेक दशके गांधी जयंतीच्या दिवशी संपूर्ण भारतभर ड्राय डे पाळला जातो. या दिवशी बार, हॉटेल्स, दारूची दुकाने, घाऊक विक्रेते आणि कॅसिनोसह दारूचा परवाना असलेल्या सर्व ठिकाणी दारू विक्री करण्यास मनाई असते. मात्र, याला अपवाद ठरली आहेत ती पूर्व हवेलीतील तीन गावे. एक लोणी काळभोर, दोन कदमवाकवस्ती आणि तिसरे म्हणजे कुंजीरवाडी (ता. हवेली) होय. या तिन्ही गावात पोलिसांच्या नाकावर टिच्चून खुलेआम मद्य विक्री चढ्या दामाने केल्याचा धक्कादायक प्रकार बुधवारी (ता. २) उघडकीस आला आहे. यामुळे ड्राय डे फक्त नावालाच की काय? अशी म्हणण्याची वेळ आली आहे.
कदमवाकवस्ती (ता. हवेली) ग्रामपंचायत हद्दीतील कवडी पाट टोलनाक्याजवळ, एचपी गेटच्या समोरील दोन हॉटेलमध्ये, लोणी कॉर्नर, माळीमळा व कुंजीरवाडी येथील थेऊर फाटा येथे एका हॉटेलमध्ये चढ्या दामाने मद्य विक्री केली जात होते. एका बाटलीच्या पाठीमागे 50 ते 100 रुपये जास्त घेतले जात होते. यामुळे मद्यपींची चांगली चंगळ झाली. तसेच कायदा व सुवस्थेचा प्रश्न देखील निर्माण झाला. ड्राय डे असताना देखील मद्य विक्री केल्याचे व्हिडीओ व पुरावे पुणे प्राईम न्यूजच्या हाती लागले आहेत.
गांधी जयंतीच्या दिवशी सर्वत्र मद्य विक्री करणारे दुकाने बंद होती. त्यामुळे हडपसरमधील एक व्यक्ती दारूच्या शोधात लोणी काळभोरला आला. त्याने कदमवाकवस्ती येथील एचपी गेटच्या समोरील एका हॉटेलमध्ये दारूची चौकशी केली. तेव्हा त्यांना दारू मिळेल, पण जास्त पैसे द्यावे लागतील असे एका इसमाने सांगितले. त्यानंतर सदर व्यक्तीस दोन्ही टपरीच्या मधल्या बोळीतून जाण्यास सांगितले. आत गेल्यानंतर बंद असलेल्या हॉटेलच्या ग्रीलमधून एका मुलाने काय पाहिजे, असे विचारले. त्यानंतर त्याला दारूची बाटली देण्यात आली. त्याला किंमतीपेक्षा 100 रुपये जास्त दराने दारू विक्री करण्यात आली.
दरम्यान, ड्राय डेच्या दिवशी बेकायदा मद्य विक्री करणे हा गुन्हा आहे. असे असताना देखील लोणी काळभोर, कदमवाकवस्ती व कुंजीरवाडी या गावात सहा ठिकाणी मद्य विक्री सुरु होती. त्यामुळे ही मद्य विक्री कोणाच्या आर्शिर्वादाने सुरु होती? यासाठी कोणी पाठबळ दिले? तसेच नियम पायदळी तुडवणाऱ्यांवर पोलीस प्रशासनाकडून कारवाईचा बडगा का उगारला जात नाही? असे अनेक प्रश्न नागरिकांनी उपस्थित केले आहेत. त्यामुळे ड्राय डे आहे, तरीही दारू प्यायचीय, तर मग चला लोणी काळभोरला असे म्हणण्याची वेळ येऊ नये.
‘पुणे प्राईम न्यूज’ने ऑगस्ट, सप्टेंबर महिन्यांमध्ये आणि 2 ऑक्टोबर रोजी सर्वेक्षण केले आहे. यामध्ये स्वातंत्र्य दिन, श्रीकृष्ण जन्माष्टमी, गणेश चतुर्थी, ईद-ए-मिलाद, अनंत चतुर्दशी आणि गांधी जयंतीच्या दिवशी मद्यविक्री झाल्याचे उघडकीस आले आहे. या महिन्यात अजून तीन ड्राय डे आहेत. ते म्हणजे 8 ऑक्टोबरला निषेध सप्ताह, 12 ऑक्टोबरला दसरा आणि 17 ऑक्टोबरला महर्षी वाल्मिकी जयंती आहे. त्यामुळे या तिन्ही गावांमध्ये मद्य विक्री करणारी दुकाने व बार अँड हॉटेल्स बंद राहतील का? हेही पाहणे अत्यंत महत्वाचे ठरणार आहे.