पुणे: सिंहगड रस्त्यावरील पूना गेट लॉजवर पोलिसांनी पत्त्यांचा जुगार खेळणाऱ्या सहा व्यावसायिकांना नुकतीच अटक केली. त्यांच्याविरुद्ध सिंहगड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. रवींद्र गुंदीया राठोड (वय ४०, रा. धानोरी), हनुमंत मानसिंग राठोड (वय ४०, रा. शिवणे), रामू दासू चव्हाण (वय ४०, रा. शिवनेरीनगर, कोंढवा), आंबू भद्रू राठोड (वय ४०, रा. लक्ष्मीनगर, कोथरूड), सत्यम खिमया राठोड (वय ३८, रा. नऱ्हे ) आणि मोहन हरी चव्हाण (वय ३६. रा. वारजे माळवाडी) अशी कारवाई करण्यात आलेल्यांची नावे आहेत.
यासंदर्भात पोलीस अंमलदार विनायक मोहिते यांनी फिर्याद नोंदवली आहे. पुना गेट लॉज येथील पाचव्या मजल्यावरील रूममध्ये काही जण जुगार खेळत असल्याची माहिती पोलिसांच्या पथकाला मिळाली. त्यानुसार, पोलिसांच्या पथकाने या खोलीवर छापा टाकला. त्या वेळी तेथे सहा जण पत्त्यांचा जुगार खेळत असल्याचे दिसून आले. त्यांच्याकडून ७३ हजार २१० रुपये व जुगाराचे साहित्य पोलिसांनी जप्त केले.