अक्षय टेमगिरे
रांजणगाव गणपती: कारेगाव येथे 27 मे रोजी सायंकाळी 6 च्या सुमारास आयटीआय रोड लगतच्या कारेश्वर इंग्लीश मिडीयम शाळेसमोर अज्ञात व्यक्तींनी चार-पाच मोटार सायकलची दगडाने तोडफोड करत एक मोटार सायकल पेटवून दिली होती. तसेच हातात लाकडी दांडके आणि कोयता घेवुन दहशत माजविली होती. या प्रकरणी आठ जणांवर रांजणगाव एमआयडीसी पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला होता. यातील सहा आरोपींना अटक करण्यात पोलिसांना यश मिळाले आहे.
रांजणगाव एमआयडीसी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 27 मे रोजी सायंकाळी 6 च्या सुमारास आयटीआय रोड लगतच्या कारेश्वर इंग्लीश मिडीयम शाळेसमोर अज्ञात व्यक्तींनी चार-पाच दुचाकी मोटार सायकलची दगडाने तोडफोड करत त्यातील एक मोटार सायकल पेटवून दिल्याची माहिती रांजणगाव एमआयडीसी पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक महादेव वाघमोडे यांना मिळाली होती. त्यानंतर वाघमोडे यांनी पोलीस अधिकारी व पोलीस स्टाफसह घटनास्थळी तात्काळ जात पेटलेली मोटार सायकल विझवली.
सदर ठिकाणी जमलेल्या गर्दीतील लोकांकडुन मिळालेल्या माहितीच्या आधारे आणि घडलेल्या प्रकाराबाबत आनंद लक्ष्मण खाडे (वय 19 रा. कारेगाव, ता. शिरुर, जि. पुणे) याच्या फिर्यादीवरुन आठ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला. फिर्यादी व त्याचा मित्र अक्षय कुटे यांना किरकोळ कारणावरुन रणजीत शितोळे, तेजस शितोळे, धनंजय शिरफुले, रोहन बोटे, शंकर करंजकर व इतर तीन जणांनी बेकायदेशीर जमाव जमवुन जबरदस्तीने त्यांना रिक्षामध्ये बसवले. त्यानंतर आयटीआय रोडलगतच्या कारेश्वर इंग्लीश मिडीयम स्कुल समोरील कंपनीजवळ नेवुन त्यांना हाताने, लाकडी दांड्याने मारहाण केली.
तसेच त्या ठिकाणी लावलेल्या पाच मोटार सायकलची दगडाने तोडफोड करुन एक मोटार सायकल पेटवुन देत मोटार सायकलचे नुकसान केले. या प्रकरणी रांजणगाव एमआयडीसी पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला होता.
सदर गुन्हयातील आरोपीचे नाव व पत्ता निष्पन्न करुन त्यांचा शोध घेण्यासाठी पोलीस निरीक्षक महादेव वाघमोडे यांनी पोलीस स्टेशनकडील तपास पथकातील सहायक पोलीस निरीक्षक मनोजकुमार नवसरे, सहायक फौजदार दत्तात्रय शिंदे, पोलिस कॉन्स्टेबल उमेश कुतवळ, विजय शिंदे यांना सुचना देऊन आरोपीचा शोध घेण्यासाठी पाठवले.
या तपास पथकाने गुन्हयातील आरोपी रणजित गंगाराम शितोळे (वय 34), धनंजय सतीष शिरफुले (वय 20), तेजस अनिल शितोळे (वय 21), शंकर जालींदर करंजकर (वय 19), गिरीष गोविंद कराळे (वय 19), प्रेमराज मधुकर वाघमारे (वय 19, सर्व रा. कारेगाव, ता. शिरुर, जि.पुणे) यांना अटक केली. त्यांना शिरुर न्यायालयात हजर केले असता 1 जुनपर्यंत पोलीस कोठडी देण्यात आली आहे. तसेच सदर गुन्ह्यामध्ये दोन विधिसंघर्षीत बालकांचे नाव, पत्ता निष्पन्न करण्यात आला आहे.
सदरची कामगिरी पोलिस अधिक्षक पंकज देशमुख, अपर पोलिस अधिक्षक रमेश चोपडे, शिरुरचे उपविभागीय पोलिस अधिकारी प्रशांत ढोले यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक महादेव वाघमोडे, सहायक पोलीस निरीक्षक मनोजकुमार नवसरे, बजरंग झेंडे, पोलीस उपनिरीक्षक निळकंठ तिडके, महिला पोलीस उपनिरीक्षक सविता काळे, सहायक फौजदार दत्तात्रय शिंदे, पोलिस कॉन्स्टेबल उमेश कुतवळ, विजय शिंदे, पोलिस हवालदार ब्रम्हा पोवार, विलास आंबेकर, पोलिस नाईक माणिक काळकुटे यांनी केली आहे. सदर गुन्हयाचा पुढील अधिक तपास सहायक पोलीस निरीक्षक मनोजकुमार नवसरे हे करत आहेत.