Pune Zika News : पुण्यात येरवडा परिसरातील प्रतीकनगरमध्ये काही दिवसापूर्वीच झिका आजाराचा रुग्ण आढळला होता. अशातच याच परिसरातच आणखी सहा संशयित रुग्ण सापडल्याने एकच खळबळ उडाली आहे. त्यांच्या रक्ताचे नमुने तपासणीसाठी राष्ट्रीय विषाणूविज्ञान संस्थेकडे (एनआयव्ही) पाठविण्यात आले आहेत. अशी माहिती महापालिकेच्या आरोग्य विभागाने दिली आहे.
दरम्यान, येरवड्यातील प्रतीकनगरमध्ये झिकाचा पहिला रुग्ण हा ६४ वर्षांची महिला होती. त्या महिलेने काही दिवसांपूर्वी पिंपरी- चिंचवडमध्ये एक सांस्कृतिक कार्यक्रमाला हजेरी लावली होती. त्यानंतर तिला ताप आला आणि अंगदुखीचा त्रास होऊ लागला. तिला एका खासगी रुणालयात दाखल करण्यात आले. तिच्या तपासणीत अखेर झिकाचे निदान झाले असल्याचे स्पष्ट झाले. या सांस्कृतिक कार्यक्रमाला केरळमधील अनेक जण उपस्थित होते. त्यातील एखाद्या बाधित व्यक्तीकडून या महिलेला संसर्ग झाला असू शकतो, असे आरोग्य विभागातील सूत्रांनी सांगितलं आहे.
येरवड्यात झिकाचा पहिला रुग्ण
यंदा पुण्यात झिकाचा पहिला रुग्ण येरवडा भागात प्रतीकनगरमध्ये मागील आठवड्यात सापडला होता. या रुग्णाची प्रकृती आता सुधारत असून सार्वजनिक आरोग्य विभाग आणि पुणे महापालिकेने या परिसरात प्रतिबंधात्मक उपाययोजना सुरू केल्या आहेत. आता याच भागात पुन्हा सहा संशयित रुग्ण आढळले असून त्यांना तापाची लक्षणे दिसून आली आहेत. त्यांच्या रक्ताचे नमुने तपासणीसाठी पाठविण्यात आले आहेत, अशी माहिती महापालिकेच्या आरोग्य विभागाने दिली आहे.