पुणे: शहरातील एका खासगी रुग्णालयाकडून शहरी गरीब योजनेतील फसवणुकीनंतर पुणे महानगरपालिकेच्या प्रशासनाला जाग आली होती. त्यानुसार आणि राज्य शासनाच्या आरोग्य विभागाच्या आदेशानुसार शहरातील रुग्णालयांची तपासणी करण्यात आली. त्यात सहा रुग्णालये ही पुणे महानगरपालिकेच्या आरोग्य विभागाच्या रडारवर आली आहेत. या रुग्णालयांना ३० जानेवारीपर्यंत सुधारणा करण्यासाठी मुदत देण्यात आली आहे.
पुणे महापालिकेच्या मोहिमेनुसार ८५० रुग्णालयांची तपासणी करण्यात आली. या मोहिमेत शहरातील रुग्णालयांतील जैव वैद्यकीय कचरा विल्हेवाट आणि इतर सुविधांची पाहणी करण्यात आल्याची माहिती सहायक आरोग्यप्रमुख डॉ. सूर्यकांत देवकर यांनी दिली आहे. शहराच्या कार्यक्षेत्रातील खासगी हॉस्पिटल्स/नर्सिंग होम्स/रुग्णालये यांना दि बॉम्बे नर्सिंग होम अॅक्ट १९४९ मधील तरतुदीनुसार पालिकेकडे नोंदणी करण्याचे आवाहन केले होते. पुणे पालिकेकडून महाराष्ट्र शुश्रूषागृहे नोंदणी नियम २०२१ शासन अधिसूचनेनुसार नर्सिंग होमची वर्षातून दोन वेळा म्हणजेच दर सहा महिन्यांतून एकदा तपासणी करण्यात येते. त्यानुसार ही तपासणी करण्यात आली आहे. त्याचबरोबर शहरातील प्रसूतिगृहांची तपासणीही सुरू करण्यात आली आहे. ही सर्व तपासणी पूर्ण झाल्यानंतर याबाबतचा अहवाल हा राज्य सरकारला पाठविण्यात येणार आहे.








