पुणे : येरवडा प्रादेशिक मनोरुग्णालयातून काही दिवसांपूर्वी वॉर्डातून रुग्ण पळून गेल्याच्या घटनेची राज्याच्या आरोग्य विभागाने गंभीर दखल घेतली आहे. याप्रकरणी उपसंचालकांनी चौकशी पूर्ण करून सहा कर्मचाऱ्यांवर निलंबनाची कारवाई केली असून, एका कर्मचाऱ्यावर निलंबनाचा आदेश प्रलंबित आहे. एकाच वेळी सहा कर्मचाऱ्यांवर कारवाई झाल्याने रुग्णालय प्रशासनात खळबळ उडाली आहे.

मागील काही दिवसांत सुजय वॉर्ड आणि 27 क्रमांक वॉर्डातून एकूण पाच रुग्ण पळून गेले होते. पुरुष परिचर, सुरक्षारक्षक आणि हवालदारांचा 24 तास कडेकोट बंदोबस्त असतानाही रुग्ण पळून जात असल्याने रुग्णालयातील सुरक्षेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले होते. त्यानंतर प्रशासनाने तपास सुरू करत सुजय वॉर्ड, 27 क्रमांक वॉर्डातील प्रत्येकी दोन कर्मचारी, मुख्य प्रवेशद्वारावरील दोन हवालदार आणि स्वयंपाक गृहातील एक स्वयंपाकी दारूच्या नशेत आढळल्याने सात कर्मचाऱ्यांना निलंबनाची नोटीस बजावली होती.

या कारवाईनंतर कामगार संघटनांनी प्रशासनाविरोधात आक्रमक भूमिका घेत आंदोलन केले होते. तथापि, या प्रकरणातील अंतिम अधिकार आरोग्य उपसंचालकांकडे असल्याने प्रशासनाने निलंबनाचा प्रस्ताव त्यांच्या मंजुरीसाठी पाठविला होता. उपसंचालक डॉ. नागनाथ येमपल्ले यांनी सखोल चौकशी केली असता वॉर्डातील तसेच प्रवेशद्वारावरील कर्मचारी दोषी असल्याचे निष्पन्न झाले. त्यानुसार त्यांनी सहा कर्मचाऱ्यांच्या निलंबनाचा आदेश जारी केला.

निलंबितांमध्ये पुरुष परिचर सागर जाधव, संतोष जंगम, रजनीकांत चौधरी, प्रभाकर मुंडकर तसेच हवालदार आनंद सावंत आणि शिवाजी वीर यांचा समावेश आहे. एका कर्मचाऱ्यावरील आदेश अद्याप प्रलंबित आहे. रुग्ण सतत पळून जाण्याच्या घटना घडत असल्याने रुग्णालयातील सुरक्षा व्यवस्थेची ढिलाई अधोरेखित झाली आहे. त्यामुळे प्रशासनाच्या भूमिकेवर आणि व्यवस्थापन क्षमतेवर गंभीर प्रश्न उपस्थित होत आहेत.







