गणेश सुळ
केडगाव : गलांडवाडी (ता. दौंड) येथे मागील वर्षी रक्षाबंधनाला भावाला राखी बांधताना स्वतःची किडनी देण्याचा दिलेला शब्द सख्या बहिणीने 11 महिन्यापूर्वीच पूर्ण करून भावाला जीवदान दिले आहे. गलांडवाडीचे माजी सरपंच संजय कदम यांना बहीण अनिता ज्ञानेश्वर जगताप (रा. न्हावी भोंगवली, ता. भोर) यांनी आपली डावी किडनी दान करून अनोख्या पद्धतीने भाऊबीज साजरी केली आहे. यामुळे जगताप यांचे बंधुप्रेम प्रेरणादायी ठरले आहे.
कदम यांच्या दोन वर्षापूर्वी सर्व शारीरिक चाचण्या केल्यानंतर त्यांच्या दोन्ही किडन्या निकामी झाल्याचे निदान झाले. घरचा कर्ता पुरुष अचानक आजारी पडल्याने संपूर्ण कुटुंबाच्या पायाखालची वाळू सरकली. पुणे येथील नामांकित दवाखान्यांमध्ये कदम यांचे डायलिसिस सुरू झाले. या काळामध्ये कदम यांना होणारा त्रास पाहून सर्वजण हेलावून गेले.
शासकीय कोट्यातून किडनी मिळवण्यासाठी ५५ जणांचे वेटिंग असल्याने डॉक्टरांनी त्वरित किडनी बदलणे गरजेचे असल्याचे सांगितले. सर्वप्रथम कदम यांच्या पत्नी सुनीता कदम यांनी किडनी देण्याची तयारी दर्शवली. परंतु रक्तगट जुळत नसल्याने डॉक्टरांनी त्यांना नकार दिला. त्यानंतर कदम यांच्या छोट्या भगिनी अनिता जगताप पुढे आल्या व स्वतःहून किडनी देणार असल्याचे सांगितले.
भगिनीचे दातृत्व व मुख्यमंत्री सहाय्यता निधीची मदत
सुदैवाने दोघांचाही रक्तगट एकच निघाला. दोघा बहीण-भावांचे डॉक्टरांकडून समुपदेशन व वेगवेगळ्या तपासण्या करण्यात आल्या. 11 महिन्यापूर्वी पुण्यातील एका नामांकित रुग्णालयामध्ये जगताप यांच्या किडनीचे कदम यांच्या शरीरामध्ये यशस्वी प्रत्यारोपण करण्यात आले. या कामासाठी दौंडचे आमदार राहुल कुल यांच्या प्रयत्नांतून पाच लाख रुपये पंतप्रधान सहाय्यता निधी व मुख्यमंत्री सहायता निधी प्राप्त झाला. सध्या कदम व जगताप ही दोन्ही भावंडाची प्रकृती ठणठणीत आहे.
थोरले बंधू संजय कदम हे आम्हाला वडिलांच्या स्थानी आहेत. लहानपणी कौटुंबिक जबाबदाऱ्या लवकरच अंगावर पडल्यानंतर त्यांनी आमच्या चारही बहिणींचा सांभाळ करत लग्न केली. दादाला डायलिसिसमध्ये होणारा त्रास पाहून मी किडनी देण्याचा निर्णय घेतला. या कामी माझ्या कुटुंबीयांनी पाठिंबा दिला. या रक्षाबंधन निमित्त माझ्या भावाला उदंड आयुष्य मिळू दे अशा सदिच्छा व्यक्त करते.
– अनिता जगताप, बहीण
अनिता सारखी बहीण मला मिळाली, हे मी स्वतःला नशीबवान समजतो. या निर्णयामुळे आमच्या बहीण भावाच्या नात्यांची वीण अधिक घट्ट झाली. माझ्या ताईचे उपकार आयुष्यभर विसरणार नाही.
– संजय कदम