नीरा : नीरा (ता. पुरंदर) येथे मोबाईलवरून ऑनलाइन कर्ज अॅपच्या माध्यमातून लाखो रुपयांची फसवणूक करणाऱ्या बहीण-भावाला न्यायालयाने पोलीस कोठडी सुनावली आहे. अस्लम ऊर्फ गोंड्या सय्यद मुलाणी व बहीण यास्मीन भालदार (दोघे रा. शिवतकारवाडी नीरा, ता. पुरंदर) अशी पोलीस कोठडी सुनावलेल्यांची नावे आहेत. मुख्य आरोपी बहीण फरार झाली आहे. याप्रकरणी रामचंद्र मारुती गायकवाड (वय ४२) यांनी जेजुरी पोलिसात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नीरा (ता. पुरंदर) येथील अस्लम ऊर्फ गोंड्या सय्यद मुलाणी व बहीण यास्मीन भालदार (दोघे रा. शिवतकारवाडी नीरा, ता. पुरंदर) या दोघांनी मिळून रामचंद्र मारुती गायकवाड (वय ४२, रा. सोमेश्वरनगर, ता. बारामती), गणेश पडघमकर (रा. नीरा) यास १ लाख रुपये, नितीन निगडे (रा. गुळुंचे, ता. पुरंदर) यास ६५ हजार रुपये, युवराज रामा चव्हाण (रा. जेऊर) यास ६२ हजार चारशे रुपये, दत्तात्रय काशीनाथ माने (रा. वाणेवाडी, ता. बारामती) यास ३५ हजार रुपये, अविनाश बाबासो गायकवाड (रा. करंजे, ता. बारामती) यास १६ हजार ५०० रुपये असे एकूण ४ लाख ८१ हजार ४०० रुपयांची मोबाइलवरून लोन अॅप डाऊनलोड करून, त्यावरून लोन करून कर्जाची वरील रक्कम स्वतःचे खात्यावर घेऊन फसवणूक केली. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक सर्जेराव पुजारी करत आहेत.