पिंपरी : जगविख्यात गायिका आशा भोसले यांच्या नावाने मिळणारा पुरस्कार हा माझ्यासाठी खूप मोठा आहे. आशाताईंच्या नावाचा पुरस्कार मला मिळेल असे कधीही वाटले नव्हते, सर्व सन्मान एकीकडे आणि हा पुरस्कार एकीकडे, एवढे या पुरस्काराचे माझ्यासाठी महत्व आहे, अशी भावना प्रसिद्ध पार्श्वगायक आणि संगीतकार शान उर्फ शांतनू मुखर्जी यांनी व्यक्त केली.
अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद पिंपरी चिंचवड शाखा, पिंपरी चिंचवड कलारंग प्रतिष्ठान, सिध्दीविनायक ग्रुप पुरस्कृत २०वा ‘आशा भोसले पुरस्कार २०२४’ प्रसिद्ध पार्श्वगायक शान ( शांतनू मुखर्जी) यांना ज्येष्ठ संगीतकार पं. हृदयनाथ मंगेशकर यांच्या हस्ते संगीत क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरीसाठी प्रदान करण्यात आला. एक लाख अकरा हजार रुपये, शाल व सन्मानचिन्ह असे या पुरस्काराचे स्वरुप आहे. यावेळी भाऊसाहेब भोईर (अध्यक्ष,अ. भा. मराठी नाट्य परिषद पि. चिं शाखा), कृष्णकुमार गोयल (उपाध्यक्ष, अ. भा. मराठी नाट्य परिषद पि. चिं शाखा) तसेच विविध क्षेत्रांतील मान्यवर उपस्थित उपस्थित होते.
शान म्हणाले, माझ्या वयाच्या १४व्या वर्षी वडील गेले. मात्र, माझ्या वडिलांच्या पुण्याईमुळेच मी आज तुमच्यापुढे उभा आहे. पं.हृदयनाथ मंगेशकर म्हणाले की, शान आणि माझी ओळख नव्हती, त्यांची गाणीही मी फारशी ऐकलेली नाहीत. पण त्यांचे वडील मानस मुखर्जी हे आमचे जवळचे मित्र होते. लता आणि आशा भोसले त्यांच्या चाहत्या होत्या. मानस यांनी खूप कष्ट घेतले, पण त्यांना अपयशाचा सामना करावा लागला. त्यांच्याच कष्टाची पुण्याई आज शान यांच्या कामी आली आहे. ज्या प्रमाणे आमच्या वडिलांची पुण्याई आम्हा भावंडाच्या उपयोगी आली, तसेच शान यांच्या बाबतीतही घडले.
प्रास्ताविकात भाऊसाहेब भोईर म्हणाले की, भारताची नव्हे तर जगाची शान असणारे पार्श्वगायक शान यांना हा पुरस्कार प्रदान केल्यामुळे पिंपरी चिंचवड शहराची शान आणखी वाढली आहे. मला नेहमी प्रश्न पडायचा मोठी माणसं मोठी का होतात? कारण ही माणसं आधी माणूस म्हणून मोठी असतात. जमिनीवर असतात. शान यांचा साधेपणा मला भावला, यामुळेच ही माणंस जगविख्यात होतात. मी शान यांना शब्द दिला होता की, कार्यक्रमाला कितीही उशीर झाला तरी आपला कार्यक्रम हा होणार कारण, तुम्ही सरस्वतीचे तर मी नटराजाचा भक्त आहे. ही भूमी मोरया गोसावींची आहे. याच भूमीत आपण शंभर वर्षात झालं नाही असं दिमाखदार शंभरावे नाट्यसमेंलन पार पाडलं. पं. हृदयनाथ मंगेशकरांनी तर मला आपल्या कुटुंबात स्थान दिले आहे. कार्यक्रमाच्या निमंत्रणासाठी जेव्हा त्यांच्या मी घरी गेलो. त्यांची अवस्था पाहून मला भरुन आलं, पण अशाही अवस्थेत ते मला म्हटले मी कार्यक्रमाला येणार आणि ते आले. लोकांना मनोरंजन करण्यासाठी सरस्वतीने पाठवलेली ही अद्भुत व्यक्तिमत्वं आहेत. मंगेशकर कुटुंबीय मला त्यांच्यातील एक सदस्य समजतात यापेक्षा माझी श्रीमंती कोणती असू शकते. ही माझी श्रीमंती म्हणजे माझ्या शहराची श्रीमंती आहे. आशाताईंची नव्वदी आणि पं. हृदयनाथ मंगेशकरांची 89वी ही आपण इथेच साजरी करणार आहोत, असंही भोईर म्हणाले.
शान यांनी त्यांचा घसा बसला असला तरी ‘जब से तेरे नैना’, ‘चांद सिफारिश जो करता हमारी’ आणि इतर गाणी गायली त्याला प्रेक्षकांचा उस्फूर्त प्रतिसाद मिळाला. शान यांनी आशा भोसले यांच्या आवाजातील मोबाईल रेकार्ड ऐकवताच प्रेक्षकांनी टाळ्यांच्या कडकडाटाने दाद दिली.
या प्रसंगी शान आणि आशा भोसले यांच्या गीतांवर आधारित संगीतरजनी कार्यक्रम सादर करण्यात आला. रसिकांकडूनही खूप प्रतिसाद मिळाला. तसेच अयोध्येत राममंदिर लोकार्पण प्रसंगी आपल्या सनई चौघडा वादनाने रामभक्त तसेच देशवासियांना मंत्रमुग्ध करणारे रमेश पाचंगे यांचा पार्श्वगायक शान यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. आभार कृष्णकुमार गोयल यांनी मानले तर सूत्रसंचालन आकाश थिटे यांनी केले.