दीपक खिलारे
इंदापूर : स्वप्नांना प्रयत्नांची जोड असेल तर ती नक्कीच पूर्ण होतात, याचा प्रत्यय वडापूरी (ता. इंदापूर) येथील सिमरन ब्रम्हदेव थोरात हिच्या गरुड भरारीवरून येत आहे. शेतकरी कुटुंबातील सिमरन थोरात देशातील पहिली जहाजावरील महिला डेक ऑफिसर बनली असू,न ती देशातील युवतींसाठी आयडॉल बनली आहे.
वडापूरी (ता. इंदापूर, जि. पुणे) येथे एका शेतकरी सामान्य आणि साध्या कुटुंबात तिचा जन्म झाला. तिचे बारावीपर्यंतचे शिक्षण इंदापूर येथील श्री नारायणदास रामदास हायस्कूलमध्ये झाले. बारावीनंतर तिने प्रवेश परीक्षा देऊन पुण्यातील महाराष्ट्र अकॅडमी ऑफ नेव्हल एज्युकेशन अँड ट्रेनिंग (एमएएनटीई) कॉलेजमध्ये २०१६ साली प्रवेश घेतला. एका छोट्या गावातून शिक्षणाचे माहेरघर असलेल्या पुणे येथे शिकण्याचे मोठे आव्हान सिमरन समोर होते. परंतु तिने कधीही हार न मानता मोठ्या आत्मविश्वासाने हे आव्हान पेलले.
सिमरनची २०१९ साली तिची कॉलेजमधूनच व्हनकुवर कॅनडा येथील सिस्पन शिप मॅनेजमेंट या कंपनीत निवड झाली. तिने बीएसस्सी नॉटीकल सायन्स ही डिग्री घेतली. या कंपनीमध्ये अनेक देशांतील मुली उच्च पदावर होत्या. परंतु भारतातून पहिल्यांदाच सिमरन हिची निवड झाल्याने इतिहास घडला. तिच्या यशस्वी कामगिरीवरून नंतर अनेक भारतीय मुलींची निवड करण्यात आली. त्याचे श्रेय सिमरनला जाते. तिने २०१९ साली पहिले जहाज ट्रेनी (डेक कॅडेट) म्हणून सुरुवात केली. त्यानंतर तिने पुढची परीक्षा देऊन लायसेन्स मिळवले. त्यानंतर तिची भारतातील पहिली महिला नेव्हीगेटिंग ऑफिसर म्हणून या कंपनीत निवड झाली. आज ही कंपनी भारतातून अनेक मुलींची निवड करत आहे.
सिमरनने आत्तापर्यंत २० पेक्षा जास्त देशांमध्ये प्रवास करून आपल्या कामाची छाप पाडली आहे. सिमरन तिच्या यशाचे श्रेय वडील ब्रम्हदेव, आई आशा तसेच भाऊ शुभम यांना देते. त्यांनी सिमरनची स्वप्ने पूर्ण करण्यासाठी जीवाचे रान केले. त्यांनी तीन एकर जमीन विकून सिमरनचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी मदत केली. त्यामुळे सिमरन म्हणते, माझ्या कुटुंबाने मालमत्तेस महत्त्व न देता मला स्वावलंबी व आत्मनिर्भर करण्यासाठी मदत केली, त्याचा सार्थ अभिमान आहे.
सध्या सिमरन व तिचा भाऊ शुभम हे दोघेही मर्चन्ट नेव्हीमध्ये ऑफिसर आहेत. प्रॉपर्टीचा विचार न करता, वेळ प्रसंगी प्रॉपर्टी विकून आई-वडील यांनी मुलांना घडविले. असे आई-वडील लाभले यांचे परम भाग्य आहे. सगळ्यांना असे आई-वडील मिळाले तर कोणीही मुलगा अथवा मुलगी अशिक्षित राहणार नाही, अशी प्रतिक्रिया सिमरन हिने व्यक्त केली आहे.