बारामती : महाराष्ट्र केसरी ठरलेला सिकंदर शेख (Sikandar Shaikh) याने शरद पवार तसेच सुप्रिया सुळे यांचीदेखील भेट घेतली आहे. शरद पवारांनी सिकंदर शेखला त्याच्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या असून, तुम्ही राष्ट्रीय स्तरावर खेळले पाहिजे, असा सल्ला दिला. गोविंद बागेत जाऊन सिकंदर शेखने शरद पवारांचे आशीर्वाद घेतले.
दरम्यान, मागील महाराष्ट्र केसरी ठरलेल्या शिवराज राक्षे याला चितपट करत सिकंदर शेखने महाराष्ट्र केसरीच्या किताबावर यंदा नाव कोरले. सिकंदर शेख याने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची काही दिवसांपूर्वी भेट घेतली होती. त्यावेळी एकनाथ शिंदे यांनी त्याचे कौतुक केले होते. दरम्यान, दोन दिवसांपूर्वी महाराष्ट्र केसरी सिकंदर शेखने मातोश्रीवर उद्धव ठाकरेंची भेट घेतली. मातोश्रीवर उद्धव ठाकरेंकडून पुष्पगुच्छ, शाल देत स्वागत करण्यात आले. ‘तू चाल पुढं’, असं म्हणत उद्धव ठाकरेंनी कौतुक केल्याचे सिकंदर शेखने सांगितले होते. यावेळी त्याचे मित्र आणि काही पैलवानदेखील हजर होते. उद्धव ठाकरेंनी चांदीची गदा हातात धरुन फोटोशूटदेखील केले होते.
प्रदीपदादा कंद आणि पुणे जिल्हा कुस्तीगीर संघ यांच्या संयुक्त विद्यमाने आणि भारतीय कुस्ती महासंघ आणि महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर संघाच्या सहकार्याने ६६ वी वरिष्ठ राज्य अजिंक्यपद आणि महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. महाराष्ट्र राज्य अजिंक्यपद कुस्ती स्पर्धेत सिंकदर शेख आणि शिवराज राक्षे यांच्यामध्ये प्रतिष्ठेच्या महाराष्ट्र केसरी किताबाची लढत रंगली. सिंकदरने माती, तर शिवराजने गादी विभागातून प्रतिस्पर्ध्यांवर सहज मात करून अंतिम फेरी गाठली होती. सिकंदरने मातीवरील अंतिम विभागात आपला लौकिक कायम राखताना वेगवान आणि आक्रमक खेळ करत पहिल्या फेरीतच संदीपवर सातत्याने ताबा मिळवत सलग दोन गुणांचा सपाटा लावला आणि दहा गुणांची वसुली करत तांत्रिक वर्चस्वावर विजय मिळवून केसरी किताबाच्या लढतीची अंतिम फेरी गाठली होती.