लोणी काळभोर : मागील चार दिवसांपासून पुणे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरील कदमवाकवस्ती (ता. हवेली) ग्रामपंचायत हद्दीतील एमआयटी कॉर्नर येथे सिग्नल धोकादायकरीत्या अवस्थेत लटकलेला आहे. हा सिग्नल वाहनचालकांना अपघाताचे आमंत्रण देत आहे. मात्र नागरिकांच्या या समस्येकडे महामार्ग प्रशासनासह स्थानिक प्रशासनाने दुर्लक्ष दिले असल्याचे समोर येत आहे.
पुणे-सोलापूर महामार्गावरील लोणी स्टेशन व एमआयटी चौकात नागरिकांची मोठ्या प्रमाणात वर्दळ असते. त्यामुळे या दोन्ही चौकात नेहमी वाहतूक कोंडी असते. या दोन्ही चौकात नेहमी छोटे मोठे अपघात होतात. तसेच या अपघातात काही जणांना आपला जीव तर काही जणांना आपले अवयव गमवावे लागतात. त्यामुळे या दोन्ही चौकात वाहतूक कोंडी व अपघात रोखण्यासाठी वाहतूक पोलिसांच्या नेमणुका केल्या आहे.
पुणे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरील वाहतूक नियंत्रित करण्याच्या उद्देशाने चौकात बसवलेल्या सिग्नल यंत्रणेचा पुरता बोजवारा उडाला आहे. वाहतुकीच्या दृष्टीने महत्त्वाचा असणाऱ्या एमआयटी चौकातील सिग्नल बंद आहे. त्यामुळे या चौकातील वाहतुकीची समस्या अगोदरच जटील झाली आहे. त्यातच या चौकात सिग्नलचा खांब पडण्याच्या बेतात आले आहेत. प्रशासनाच्या या कारभारामुळे चौकातील वाहतूक मात्र अनियंत्रित झाली आहे.
दरम्यान, एमआयटी चौकात मागील चार दिवसांपासून बंद असलेला सिग्नल रस्ता दुभाजकावर लटकलेल्या अवस्थेत आहे. हा सिग्नल रस्त्याच्या बाजूला कलंडला आहे. तसेच वारा आल्यानंतर हा सिग्नल हवेत गोल फिरतो. याठिकाणी असलेली नागरिकांची वर्दळ पाहता या सिग्नलमुळे मोठा अपघात घडण्याची शक्यता नाकारता येत नाही. सिग्नलच्या दुरुस्तीची कोणतीच कार्यवाही अजून झाली नसल्याने प्रशासन याबाबत किती गंभीर आहे हे स्पष्ट होत आहे. मात्र, जर एखादा अपघात झाला तर याला जबाबदार कोण? असा सवाल स्थानिक नागरिकांनी केला आहे.
कोट
एमआयटी चौकातील सिग्नल हा रस्त्याच्या मध्यभागी असल्याने अपघात होऊ शकतो. त्यामुळे प्रशासनाने हा धोकादायकरीत्या अवस्थेत लटकलेला सिग्नल काढावा, अन्यथा दुरुस्त करावा.
– उमेश काटवाटे, वाहनचालक, लोणी काळभोर, ता. हवेली