विशाल कदम
लोणी काळभोर : लोणी काळभोर (ता. हवेली) येथील सिद्धी ज्ञानेश्वर भुजबळ हिने ‘अस्मिता खेलो इंडिया महिला किक बॉक्सिंग (मुष्टियुद्ध) स्पर्धे’मध्ये सुवर्णपदक पटकावले आहे. सिद्धीने मिळविलेल्या यशाबद्दल तिचे लोणी काळभोरसह जिल्ह्यातून भरभरून कौतुक होत आहे.
छत्रपती संभाजीनगर येथे ‘अस्मिता खेलो इंडिया महिला किक बॉक्सिंग लीग’ स्पर्धा 13 व 14 जानेवारीला स्पर्धा पार पडली. या स्पर्धेत हजारो विद्यार्थी सहभागी झाले होते. या स्पर्धेत सिद्धीनेही सहभाग घेतला होता. या स्पर्धेत सिद्धीने फुल कॉन्टॅक्टमधील 56 किलो वजनी गटात हे सुवर्णपदक पटकाविले आहे. सिद्धीला 36 मराठा रेजिमेंटचे कर्नल पियुष मिश्रा यांच्या हस्ते प्रमाणपत्र व मेडल देण्यात आले. यावेळी महाराष्ट्र बॉक्सिंग असोसिएशनचे अध्यक्ष निलेश शेलार, पुणे जिल्हाध्यक्ष सतीश राजहंस आदी मान्यवर उपस्थित होते.
सिद्धीचे वडील ज्ञानेश्वर भुजबळ हे एका कंपनीत काम करतात. तिची आई वैशाली या उरुळी कांचन येथील एका इंग्रजी माध्यमाच्या शाळेत शिक्षिका म्हणून काम करतात. तर धाकटा भाऊ यश हा बारावीच्या वर्गात शिक्षण घेत आहे. सिद्धीने दहावीपर्यंतचे शिक्षण कदमवाकवस्ती (ता. हवेली) येथील सेंट तेरेसा स्कूल या इंग्रजी माध्यमाच्या शाळेतून पूर्ण केले. त्यानंतर तिने शिवाजीनगर येथील मॉडेल कॉलेजमधून विज्ञान शाखेतून बारावी पूर्ण केली. आता सिद्धी यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठात कला शाखेच्या तृतीय वर्षात शिक्षण घेत आहे.
दरम्यान, अस्मिता खेलो इंडिया महिला किक बॉक्सिंगमधील फुल कॉन्टॅक्ट स्पर्धेत सिद्धीने प्रथम क्रमांक मिळवून सुवर्णपदक पटकावले. तिने सुवर्ण पदक जिंकून लोणी काळभोर गावाच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला आहे. त्यामुळे सिद्धीवर लोणी काळभोर व परिसरातील नागरिकांकडून कौतुकाचा वर्षाव होत आहे.
आई-वडिलांनी दिलेल्या प्रोत्साहनामुळे यश
याबाबत बोलताना सिद्धी म्हणाले की, ”ग्रामीण भागात राहत असून सुद्धा मला माझ्या आई-वडिलांनी किक बॉक्सिंग स्पर्धेसाठी नेहमी प्रोत्साहन दिले आहे. त्यामुळे मला हे यश मिळाले आहे. तसेच या यशासाठी किक बॉक्सिंगचे प्रशिक्षक सचिन राजन सर यांचे मार्गदर्शन मिळाले. पुढे मी आंतरराष्ट्रीय खेळाडू होऊन देशासाठी अनेक पदके जिंकण्यासाठी प्रयत्न करणार आहे”.