पुणे : पुण्यातील गणेश पेठेत मारहाणीचा राग मनात धरुन टोळक्याने सिद्धार्थ हादगे याचा कोयत्याने सपासप वार करुन निर्घृण खून केल्याची घटना घडली होती. ही घटना 20 नोव्हेंबर 2023 रोजी मध्यरात्री साडेबारा वाजण्याच्या सुमारास गणेश पेठेतील काझी बिल्डींगच्या टेरेसवर घडली होती.
याप्रकरणातील आरोपी ललीत पवन वंगारी, वैभव शहापुरकर आणि यश चव्हाण यांना अतिरिक्त सत्र न्यायालयाचे न्यायाधीश व्ही.डी. निंबाळकर यांनी जामीन मंजूर केला आहे. वैभव शहापुरकर आणि यश चव्हाण हे आंदेकर टोळीतील असून गुन्हा घडल्यानंतर एका महिन्याच्या आत आरोपींना जामीन मंजूर करण्यात आला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी कि, तुषार कुंदर आणि सिद्धार्थ नंदकुमार हादगे यांच्यामध्ये 2021 मध्ये वाद झाले होते. त्यावेळी हादगे याने तुषार आणि त्याचा भाऊ आशिष कुंदुर याच्यावर वार केले होते. याचाच राग मनात धरून हर्षल पवार हा शेर-ए-पंजाब बार येथून जात असताना, हादगे व त्याचा सोबतचा अक्षय अमराळे याने त्याला बोलावून घेत शिवीगाळ करुन मारहाण केली.
हादगेच्या तावडीतून सुटून हर्षल घरी आला आणि त्याने मारहाण केल्याचे सांगितले. त्यानंतर हर्षल पवार, आशुतोष वर्तले, प्रथमेश कांबळे, प्रतिक करपेकर, समर्थ वर्दैकर, भाऊ आशिष कुंदुर, वैभव शहापुरकर, आयुष बिडकर, ललीत वंगारी, यश चव्हाण असे सर्वजण शिवरामदादा तालीम समोरील इमारतीत गेले. त्याठिकाणी सिद्धार्थ हादगे याच्यावर वार करून दगडाने ठेचून त्याचा खून केला.
या खून प्रकरणात आरोपी ललीत वंगारी, वैभव शहापुरकर आणि यश चव्हाण याला अटक करण्यात आली आहे. आरोपीने अॅड. मिथून चव्हाण यांच्या मार्फत न्यायालयात जामीनासाठी अर्ज केला होता. अॅड. चव्हाण यांनी केलेला युक्तीवाद ग्राह्य धरुन न्यायालयाने तिघांना 50 हजार रुपयांच्या जातमुचलक्यावर जामीन मंजूर करण्यात आला आहे.