पुणे : बाजार समितीचे केंद्रीकरण करणारे २०१८ चे विधेयक (राष्ट्रीय दर्जा बाजार समिती बनविणे) मागे घ्यावे, माथाडी कायद्याची राज्यभरात काटेकोरपणे अंमलबजावणी करावी, या मागणीसाठी श्री छत्रपती शिवाजी मार्केट यार्डातील कामगार संघटनांनी सोमवारी बंद पाळला. आज सकाळपासून यार्डातील कामकाज बंद ठेवण्यात आले आहे. शेतकऱ्यांनी शेतीमाल विक्रीस पाठवू नये, असे आवाहन देखील बाजार समितीकडून करण्यात आले आहे. पुण्यातील मार्केट यार्ड आज सकाळपासूनच बंद असल्यामुळे या ठिकाणी शुकशुकाट पाहायला मिळत आहे.
राज्य शासनाने कृषी उत्पन्न पणन अधिनियम विधेयकात सुधारणा प्रस्तावित केल्याने बाजार समितीसह समितीतील सर्वच घटकांचे अस्तित्व संपुष्टात येणार आहे. बाजार समित्यांवर प्रशासक बसवण्याचा घाट सुरू असल्याचा स्वाभिमानीसह शेतकरी संघटनांनी आरोप केला आहे. आज राज्यातील बाजार समित्या बंद ठेवण्याचे आवाहन केले आहे.
राज्यातील बहुतांश बाजार समितीच्या आवारात शेतीमालाची आवक झाली नाही. परराज्यांतील शेतीमालाची आवक सोमवारी झाली. मात्र, पुणे विभागातील शेतकऱ्यांनी शेतीमाल विक्रीस पाठविला नाही. बंदमध्ये श्री छत्रपती शिवाजी मार्केट यार्डातील कामगार संघटना सहभागी झाल्या होत्या, अशी माहिती श्री छत्रपती शिवाजी मार्केट यार्ड कामगार युनियनचे अध्यक्ष संतोष नांगरे यांनी दिली.
माथाडी कायदा मोडीत काढण्यासाठी माथाडी विधेयक मांडण्यात आलेले आहे. संबंधित विधेयक मागे घेण्यात यावे. माथाडी मंडळात कामगारांच्या मुलांना प्राधान्याने नोकरी द्यावी, तसेच लोकशाही पद्धतीने व्यवस्थित बाजार समित्या सुरू आहेत. त्यांचे केंद्रीकरण करण्याची गरज नसल्याचे कामगार संघटनांकडून दिलेल्या निवेदनात म्हटले आहे.