युनूस तांबोळी
शिरुर : विवाह म्हटला की विश्वासाच्या नात्यातून दोन परिवार एकत्र येतात. पती-पत्नीच्या संसाराची सुरुवात होऊन, दोघेही सुखी संसाराची स्वप्ने रंगवितात. अशातच या नात्याचा विश्वासघात झाल्याची घटना घडली तर ती मात्र फारच असह्य होते. असाच एक प्रकार शिरूर तालुक्यातील तांदळी गावात घडला आहे. नवी नवरी बिदाई होऊन सासरी आली खरी; पण लग्नाच्या पहिल्या रात्रीच लाखो रूपयांचे दागिने घेऊन तिने पोबारा केला. या घटनेमुळे लग्न जमविणाऱ्या मध्यस्थाला पळता भुई थोडी झाली…
सध्या सर्वत्र सनई-चौघड्याचे सूर कानी पडत आहेत. विवाहाची धामधूम सुरू आहे. लग्नसराईच्या दिवसांत अनेक नवरदेव गुडघ्याला बाशिंग बांधून तयार असल्याचे दिसते. मात्र, अनेकदा मनासारखी वधू न मिळाल्याने उपवर नवरदेव लग्नासाठी कोणतीही तडजोड करायला तयार असतात. मध्यस्थामार्फत लग्न जमविताना ‘अडला नारायण, धरी गाढवाचे पाय’ असेही चित्र दिसते. असाच एक प्रकार शिरूर तालुक्यातील तांदळी येथे घडला.
तांदळी येथील एका कुटूंबाने मध्यस्थामार्फत मुलाचे लग्न जमविले. त्यासाठी मध्यस्थाने वरपित्याकडून दोन लाख रूपये रोख घेतले. मुलगी दाखविण्याचा कार्यक्रम अहमदनगर येथील हॅाटेलमध्ये मोठ्या उत्साहात पार पडला होता. दोन्ही कुटूंबात ठरल्याप्रमाणे तांदळी येथे लग्न सोहळा पार पडला. गावातील लग्न म्हणून ग्रामस्थ देखील शुभेच्छांचा वर्षाव करण्यासाठी व शुभाशीर्वाद देण्यासाठी या शुभकार्यात सहभागी झाले होते.
लग्न सोहळा उत्साहात पार पडला. त्यानंतर वधूची बिदाई करत वधूकडील वऱ्हाडी मंडळी त्यांच्या गावी निघून गेली. रिवाजाप्रमाणे एक करवली नवरीसोबत थांबली होती. दरम्यान, मध्यरात्रीच्या सुमारास या दोघींनी घराला बाहेरून कडी लावून अंगावरील व घरातील दागिन्यांसह चारचाकी गाडीतून धुम ठोकली. पहिल्याच रात्री नवरीने धूम ठोकल्याचे लक्षात आल्यावर लग्नघरात एकच गोंधळ उडाला.
दरम्यान, आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यावर वरपित्याने मध्यस्थाला फोन करून जाब विचारला. त्यावेळी त्याने उडवाउडवीची उत्तरे दिली. त्यामुळे या कुटुंबाने शिरूर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. याबाबत शिरूर पोलीस स्टेशन पुढील तपास करत आहे.