लोणी काळभोर : लोणी काळभोर (ता.हवेली) येथील समाजभूषण गणपतराव काळभोर महाविद्यालयात प्रथम वर्षात शिकणाऱ्या शुभम काळभोर याने दक्षिण – पश्चिम विभाग आंतर विद्यापीठ वेटलिफ्टिंग स्पर्धेमध्ये 73 किलो वजन गटात उत्कृष्ट कामगिरी केली असून आगामी काळात पंजाबमध्ये होणा-या अखिल भारतीय आंतर विद्यापीठ स्पर्धेसाठी त्याची निवड करण्यात आली आहे.
ही स्पर्धा गुंटूर (आंध्रप्रदेश राज्य) येथील आचार्य नागार्जुन विद्यापीठ येथे पार पडली. या स्पर्धेत शुभम काळभोर याने 73 किलो वजन गटातील स्नॅच या प्रकारात 121 किलो व क्लीन व जर्क या प्रकारात 150 किलो असे एकूण 271 किलो वजन उचलले. पंजाब मधील लवली प्रोफेशनल विद्यापीठात होणाऱ्या अखिल भारतीय आंतर विद्यापीठ वेटलिफ्टिंग स्पर्धेत तो सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे प्रतिनिधित्व करणार आहे.
गुंटूर येथील आचार्य नागार्जुन विद्यापीठात झालेल्या दक्षिण – पश्चिम विभाग आंतर विद्यापीठ वेटलिफ्टिंग स्पर्धेत भारतातील दक्षिण व पश्चिम विभागातील विद्यापीठांच्या खेळाडूंनी सहभाग घेतला होता. या सर्व खेळाडूंमधून उत्कृष्ट प्रदर्शन करणाऱ्या मोजक्या खेळाडूंपैकी शुभम एक आहे. या यशाबद्दल महाविद्यालयातील खेळाडूंना नेहमी प्रोत्साहन देणारे महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. ए. के. मंजुळकर यांनी शुभमचे कौतुक करत पुढील स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या. श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेचे पुणे विभाग प्रमुख व सहसचिव (प्रशासन) प्राचार्य सिताराम गवळी यांनी शुभमचे अभिनंदन केले. महाविद्यालयाच्या शारीरिक शिक्षक संचालिका डॉ. पाटील यांचे शुभमला मार्गदर्शन लाभले.