मावळ : मावळचे विद्यमान खासदार श्रीरंग बारणे यांच्या प्रचाराचा नारळ मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या सभेत फुटणार असल्याचे बोलले जात आहे. पण मावळ लोकसभा मतदारसंघातील दोन आमदारांनी श्रीरंग बारणे यांच्या उमेदवारीला विरोध दर्शवला आहे. सुनील शेळके आणि अण्णा बनसोडे यांनी बारणे यांच्या उमेदवारीला थेट विरोध दर्शवला आहे.
पार्थ पवारांनी मावळमधून निवडणूक लढवावी
पार्थ पवारांनी मावळ लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवावी, अशी मागणी अण्णा बनसोडेंनी केली आहे. अजित पवार गटाचे आमदार सुनील शेळकेंनी बारणेंच्या उमेदवारीला विरोध केल्यानंतर आता बनसोडेंनी थेट पार्थ पवारांच्या उमेदवारीची मागणी केली आहे. पार्थ पवार यांनी मावळमधून निवडणूक लढवावी. मागच्या वेळी खरं तर पार्थ पवार नवीन होते. पण त्यावेळेस त्यांनी जे काम केलं होतं, त्या दिवसापासून आज गेली पाच वर्षापर्यंत मावळ लोकसभा मतदारसंघातील जनतेच्या ते संपर्कात आहेत. पक्षांनी जर त्यांना उमेदवारी दिली तर नक्कीच ते निवडून येतील, असे अण्णा बनसोडे म्हणाले.
सुनील शेळके यांनी मावळ लोकसभा मतदारसंघावर दावा केलाय. राष्ट्रवादी काँग्रेसला हा मतदारसंघ मिळावा, असे तुम्हालाही वाटतेय का? तर अण्णा बनसोडे, मावळ लोकसभा मतदारसंघ ज्या पक्षाला जाईल त्या पक्षाचे काम मी प्रामाणिकपणे करणार आहे असे म्हणाले. राष्ट्रवादी काँग्रेस, एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणीस असतील यांचे तिन्ही पक्ष महायुतीत काम करत असताना धोरणामध्ये जो निर्णय होईल, त्या निर्णयानुसार उमेदवाराचा प्रचार आम्ही कार्यकर्ते मनापासून करणार आहोत असे अण्णा बनसोडे म्हणाले.