पुणे : पुण्यातील श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती मंदिरात आज श्री उमांगमलज जन्मोत्सव सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. हा जन्मोत्सव सोहळा साजरा करताना दगडूशेठ गणपतीला 1100 नारळांचा महानैवेद्य दाखविण्यात आला.
श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट, सुवर्णयुग तरुण मंडळातर्फे मंदिरात श्री उमांगमलज जन्मोत्सव सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. नारळांची आरास व धार्मिक विधी मंदिरामध्ये पार पडले. पहाटे तीन वाजता ब्रह्मणस्पती सूक्तपठण झाले. रसिक कुलकर्णी आणि सानिका कुलकर्णी यांनी स्वरपूजा बांधली.
यावेळी बोलताना ट्रस्टचे अध्यक्ष सुनील रासने म्हणाले, ‘देवी पार्वतीने अंगावरच्या मळापासून एक पुतळा बनवला होता. त्याला जिवंत केले. पुढे त्याचे आणि शंकरांचे युद्ध झाले. भगवान शंकरांनी त्या मुलाचे मस्तक उडविले. देवी पार्वतीच्या संतापाला शांत करण्यासाठी शेवटी त्या बालकाच्या धडावर भगवान श्री विष्णूंनी आणलेले गज मस्तक बसविले आणि त्यालाच श्री गजानन असे म्हटले आहे. ही श्री गणेश जन्माची कथा आपण नेहमी ऐकतो ती या अवताराची कथा आहे. या अवतारात उमांगमलज हे गणेशाचे नाव आहे. आपली बुद्धी हीच पार्वती देवी आहे. तिच्यावर चढलेला अहंकार आणि ममत्वाचा थर हाच मळ आहे. हा अहंकार आणि ममत्व दूर झाले की ज्या मोरयांची प्राप्ती होते त्यांना उमांगमलज असे म्हणले जाते.’
आज ‘श्रीफला’मध्ये सजलेल्या गणरायाचे रूप डोळ्यांमध्ये साठवून घेण्याबरोबरच भाविकांनी मोबाईलमध्ये गजानानाचे छायाचित्र टिपले आहेत. यावेळी गायन, तबला साथ, ऑक्टपॅड वादन अशा कार्यक्रमांचे आयोजनही करण्यात आले आहे. दरम्यान, बाप्पाचे दर्शन घेण्यासाठी पहाटेपासूनच भाविकाची मोठी गर्दी जमली आहे.