गणेश सुळ
केडगाव : सध्या पूर परिस्थिती तसेच काही वेळेस कडक उन्हाळा त्यामध्ये तीव्र चारा टंचाई, असतांना दौंड तालुक्यातील नाथचीवाडी येथे श्रीकृष्ण नंदिनी गोशाळेत 90 गायीं, बैलांचे संगोपन कोणत्याही सरकारी अनुदानाशिवाय केले जाते. 2018 साली सातारा जिल्ह्यातील दंडेश्र्वर गोशाळा काही कारणास्तव बंद करण्यात आली होती. त्यावेळी नाथचीवाडी येथील ह.भ.प श्रीराम इनामके यांनी त्याठिकाणी असलेल्या 17 गायी आणून या श्रीकृष्ण नंदिनी गोशाळेची स्थापना केली. 17 गायीपासून सुरुवात करून आज मितीला 90 गायींचे संगोपन केले जात आहे.
कत्तलीसाठी जाणार्या गाई सोडवून त्यांचा सांभाळ केला जातो. शेणखत विक्री व दानशूरांकडून होणारी मदत हे या गोशाळेचे उत्पन्नाचे साधन आहे. तसेच स्वतः चे 2.5 एकर शेत जमिनीमध्ये गायींसाठी शेड व उर्वरित जागेत चारा पिकवला जातो. तसेच ह. भ. प इनामके महाराज हे कीर्तन प्रवचन, गायन, तबलावादन अशा सांस्कृतिक सेवेतून मिळणारे पैसे देखील या गोशाळेवरच खर्च करतात. तसेच परिसरातील काही व्यक्ती व संस्था मदत करतात. वाढदिवस, लग्न वाढदिवस, काही सामाजिक धार्मिक कार्यक्रमातून रोख किंवा चारा स्वरूपात मदत प्राप्त होते.
सध्या पूर परस्थिती, कडक उन्हाळा, दुष्काळ अशा परिस्थितीमध्ये उत्पन्न व खर्च यामध्ये खूप तफावत येते. अशा कठीण परिस्थितीमध्ये इनामाके हे अतिशय जिद्दीने, कष्टाने गोशाळा सांभाळतात. यापुढेही जनावरे सांभाळण्याची तयारी गोशाळेने दर्शविली आहे. गोमाता व इतर जनावरांचे दायित्व स्वीकारणाऱ्या गोशाळेचे सर्वत्र कौतुक केले जात आहे.
संजय थोरात युवा मंच यांच्यावतीने नेहमी सामजिक तसेच धार्मिक उपक्रम राबविले जातात. त्याचाच एक भाग म्हणून शुक्रवार 9 रोजी नागपंचमीच्या मुहूर्तावर अनेक ठिकाणीं झाडे लावणे तसेच चारा वाटप करण्यात आले होते. यावेळी नाथचीवाडी येथील श्रीकृष्ण नंदिनी गोशाळा येथे चारा वाटप प्रसंगी संजय थोरात, श्रीराम इनामके, नागनाथ मुळीक, साजन दिवे हे उपस्थित होते. या प्रसंगी इनामके यांनी आपल्या गोशाळेबद्दल सविस्तर माहिती दिली.
2018 साली बळीराजा संकटात असताना गोशाळा त्यांच्या मदतीला धावून आली अन् चारा व पाण्याच्या कारणामुळे कोणत्याही परिस्थितीत जनावरे विकू नका. जनावरांचा आम्ही विनामूल्य सांभाळ करतो. चारा पाण्याची व्यवस्था झाल्यानंतर जनावरे घेऊन जा असे आवाहन इनामके यांनी केले होते. या आवाहनाला लक्षणीय प्रतिसाद मिळाला व त्यांनी 125 जनावराचा सांभाळ करुन परस्थिती सुधारल्यावर ती जनावरे शेतकऱ्यांना सुपूर्त करण्यात आली. गोशाळेत जनावरांना चारा-पाणी बरोबरच त्यांची वैद्यकीय तपासणी देखील केली जाते.
गरज पडल्यास औषधोपचार केले जातात. त्यासाठी तब्बल 25 वर्ष कीर्तन, प्रवचन, गायन, वादन या सेवेतून मिळणारे उत्पन्न तसेच स्वतः च्या 2.5 एकर शेत जमिनीमध्ये पिकणारा चारा यातून वार्षिक फक्त 20 टक्के चारा भागतो. उर्वरित 80 टक्के चारा हा बाहेरूनच विकत घ्यावा लागतो. त्यासाठी दानशूरांकडून होणारी मदत तसेच, वाढदिवस, लग्न वाढदिवस, काही धार्मिक ,सामजिक, सांस्कृतिक कार्यक्रम रोख किंवा चारा स्वरूपात होणारी मदत या श्रीकृष्ण नंदिनी गोशाळेत एक खारीचा वाटा बनेल. आपल्या हिंदु धर्म शास्त्रानुसार गोसेवा ही सर्वोत्तम सेवा आहे. त्यासाठी श्रीकृष्ण नंदिनी गोशाळा नाथचीवाडी, तालुका दौंड येथे अथवा 8379826885 या क्रमांकावर संपर्क साधावा.