पुणे : पुण्यामध्ये श्रीमंत दगडूशेठ गणपतीची विसर्जन मिरवणूक यंदा ‘श्री उमांगमलज’ रथातून निघणार आहे. दहा दिवसांच्या गणेशोत्सवानंतर अनंत चतुर्दशी दिवशी बाप्पा भक्तांची रजा घेतात.
श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट, सुवर्णयुग तरुण मंडळच्या वतीने उत्सवाच्या 132 व्या वर्षानिमित्त आयोजित गणेशोत्सवाची सांगता मिरवणूक यंदाही अनंत चतुर्दशीला मंगळवार, (दि. 17 सप्टेंबर) रोजी सायंकाळी 4 वाजता थाटात निघणार आहे.
यंदाची प्रतिकृती असलेल्या जटोली शिवमंदिराच्या विषयाप्रमाणे सांगता मिरवणूक रथाची मांडणी करण्यात आली आहे. श्री उमांगमलज रथाच्या माथ्यावर जटा सोडलेली शंकराची मूर्ती असणार आहे. त्याच्या बाजूला त्रिशूळ आणि डमरु देखील आहे. कळस म्हणून मोठा रुद्राक्ष दाखविण्यात आला आहे. नागाच्या फण्यावर हा तोललेला आहे, बाजूला 21 छोटे कळस लावण्यात आले आहेत. तर, रथावर 23 नंदींचे चेहरे बसविण्यात आले आहेत. तसेच रथावर तब्बल 18 क्रिस्टलचे झुंबर लावण्यात येतील.
रथावर 8 खांब साकारण्यात आले आहेत. प्रत्येक खांबांवर बेलाच्या पानांचे डिझाईन साकारण्यात आले आहे. रथाचा आकार 15 बाय 15 फूट असून उंची 24 फूट इतकी आहे. रथावर एलईडी व पार लाईटचे फोकस लावण्यात येणार आहेत. रथामध्ये बाप्पा ज्या ठिकाणी विराजमान होणार आहेत. तेथे मोराची डिझाईन देखील साकारण्यात आली आहे.
युवा कलादिग्दर्शक विराज खटावकर यांनी हा रथ साकारला आहे. भाविकांना वैभवशाली विसर्जन मिरवणूकीमध्ये सहभागी होत दर्शन घेण्याचं आवाहन करण्यात आलं आहे.