यवत (पुणे) : आम्ही जातो माघारी पंढरीनाथा। तुझे दर्शन झाले आता ।। म्हणत जड अंत:करणाने संताच्या पालख्यांनी व वारकऱ्यांनी परतीचा प्रवास सुरु केला आहे.
पंढरपुरातील गोपाळकालानंतर श्री विठ्ठलाचे दर्शन घेत मानाच्या पालख्यांनी परतीचा प्रवास सुरु केला. एकामागोमाग एक अशा सुमारे 400 संतांच्या दिंड्या, पालख्या विठ्ठल नामाचा गजर करीत परतीच्या प्रवासाला लागल्या आहेत. पंढरपूरहून गोपालकाला, पादुकांना स्नान, श्री विठ्ठल रुक्मिणी भेट आणि नगर प्रदक्षिणा करून जगदगुरू संत तुकाराम महाराज पालखी रविवारी (दि.21) जुलै रोजी पंढरपुरहून परतीच्या प्रवासाला निघाली. (दि. 27 जुलै) रोजी पालखी वरवंड मुक्कामी आली होती आज पहाटे पाच वाजता पालखीने प्रस्थान केले.
चौफुला व भांडगाव प्रवास करत पालखी सोहळा सकाळी 10 च्या सुमारास यवत येथे दाखल झाला. यावेळी यवत ग्रामस्थांच्या वतीने पालखीचे स्वागत करण्यात आले. यानंतर पालखी सोहळा विश्रांतीसाठी श्री काळभैरवनाथ मंदिर येथे विसावला. पालखी सोबत असणाऱ्या वारकरी बांधवांच्या जेवणाची उत्तम सोय यवत ग्रामस्थांच्या वतीने करण्यात आली होती.
आषाढी एकादशी निमित्त पंढरपुरची वारी करून जगद्गुरु संतश्रेष्ठ श्री तुकाराम महाराज यांच्या पालखी सोहळ्याने देहूकडे परतीच्या प्रवासासाठी गेल्या रविवारी (दि. 21) प्रस्थान केले असून (दि.25 जुलै) रोजी पालखी सोहळ्याने पुणे जिल्ह्यात प्रवेश केला. बुधवारी (दि.31) रोजी पालखी सोहळा देहू येथे पोहचणार आहे. रात्रीचा मुक्काम दौंड तालुक्यातील वरवंड येथे झाला. आज पहाटे पालखी सोहळ्याने देहुकडे प्रस्थान केले. परतीच्या मार्गावर असलेल्या पालखी सोहळ्याचे वाटेत चौफुला, वाखरी, भांडगाव, यवत येथील ग्रामस्थांनी सोहळ्याचे उत्साहात स्वागत केले.
यवत येथे पालखी दर्शनासाठी ग्रामस्थांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती. काही काळ विश्रांती घेत पालखी सोहळ्याने सकाळी साडे अकराच्या सुमारास यवतकरांचा निरोप घेत देहुकडे प्रस्थान केले. आजचा मुक्काम लोणी काळभोर (कदमवाक वस्ती ) येथे असून (दि.29 जुलै) नवी पेठ-पुणे, (दि.30 जलै) पिंपरी गाव याप्रमाणे मुक्काम करून बुधवार (दि.31 जुलै) रोजी पालखी सोहळा देहू मध्ये दाखल होणार आहे.
परतीच्या पालखी सोहळ्यास वाढता प्रतिसाद!
पूर्वी परतीच्या पालखी सोहळ्यामध्ये वारकरी अत्यल्प असायचे. प्रवासात नागरिकांचाही फारसा प्रतिसाद मिळत नसे. परंतु अलीकडच्या काळात परतीच्या प्रवासामध्ये वारकर्यांची संख्या वाढली. प्रवासा दरम्यान सर्व गावात नागरिकांचाही उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असल्याची माहिती पालखी सोहळ्यातील वारकऱ्यांनी दिली
उरुळी कांचन येथील मुक्काम रद्द
दरवर्षी पालखी सोहळा वरवंड येथील मुक्कामानंतर उरुळी कांचन येथे मुक्कामासाठी दाखल होत असतो. परंतु पालखी सोहळा पंढरपूर कडे जात असताना उरुळी कांचन येथे झालेल्या प्रकारामुळे यावर्षी पालखी सोहळाचा परतीचा मुक्काम उरुळी कांचन येथे न करता लोणी काळभोर येथे करणार आहे .