पुणे : रामजन्मभूमी अयोध्येत प्रभू रामलल्लाच्या प्राणप्रतिष्ठापना सोहळा सोमवारी (दि.२२) पार पडला. येथील एमआयटी आर्ट डिझाईन अँड टेक्नॉलॉजी विद्यापीठात विद्यार्थ्यांकडून ढोल-ताशांच्या गजरात जल्लोषात स्वागत करण्यात आले.
विद्यापीठाच्या प्रवेशद्वारावरील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यासमोरून निघालेल्या मिरवणुकीची आघाडी ‘गजकर्ण’ या विद्यार्थ्यांच्या ढोल-ताशा पथकाने केली. तसेच यावेळी, टाळ-मृदुंगाच्या आवाजाने विद्यापीठाचे वातावरण भक्तीमय झालेले पाहायला मिळाले.
विद्यापीठाचे कार्याध्यक्ष व कुलगुरू प्रा. डॉ. मंगेश कराड, प्रा. डॉ. सुनिता कराड, प्र. कुलगुरु डॉ. अनंत चक्रदेव, डॉ. रामचंद्र पुजेरी, डॉ. मोहित दुबे, कुलसचिव डॉ. महेश चोपडे यांच्यासह विद्यापीठाचा सर्व प्राध्यापक वर्ग या मिरवणुकीत सामील झाला होता. विद्यापीठाच्या ‘स्कूल ऑफ आर्किटेक्चर’कडून साकारण्यात आलेल्या राम मंदिराची प्रतिकृती या मिरवणुकीचे प्रमुख आकर्षण होती.
विद्यापीठातील हनुमंतांच्या पुतळ्याचे दर्शन घेऊन श्री विश्वस्वरुप देवता मंदिराच्या प्रांगणात या मिरवणुकीचा समारोप झाला. त्यानंतर विश्वस्वरूप मंदीरात प्रा. डॉ. कराड दाम्पत्याकडून होमहवन करून रामलल्लाची पूजा करण्यात आली. त्यानंतर विद्यार्थ्यांनी मंदिराच्या प्रांगणात सुंदर पारंपारिक नृत्याविष्कार सादर करून सर्वांची मने जिंकली.
अयोध्येत झालेल्या राम मंदिर प्रतिष्ठापनेचे यावेळी स्क्रीन लावून थेट प्रक्षेपण देखील दाखवण्यात आले होते. अयोध्येत रामलल्लाची प्राणप्रतिष्ठापना झाल्यानंतर ‘जय श्रीराम’च्या जयघोषात प्रसाद वाटप करून या कार्यक्रमाचा समारोप करण्यात आला.