– गोरख जाधव
डोर्लेवाडी, (पुणे) : बारामतीचा मुक्काम आटपून पंढरीच्या दिशेने निघालेल्या श्री संतराज महाराज पालखी सोहळ्याचे डोर्लेवाडीसह परिसरात मोठ्या भक्तीभावाने व उत्साहात स्वागत करण्यात आले. टाळ अन् विठ्ठल नामाच्या गजरात श्री संतराज महाराजांच्या पालखीचे डोर्लेवाडी गावामध्ये आगमन झाले. पालखी सोहळा डोर्लेवाडीमध्ये दाखल होताच सांप्रदायिक भजनी मंडळ, ग्रामपंचायत व नागरिकांच्या वतीने भव्य स्वागत करण्यात आले. या वेळी सरपंच, उपसरपंच, सदस्य उपस्थित होते.
यावेळी संत तुकाराम महाराज विद्यालय या शाळेतील विद्यार्थ्यांनी विठ्ठल, रखुमाई तसेच वारकऱ्यांची वेशभूषा केलेली होती. त्यामुळे डोर्लेवाडी परिसरातील वातारण भक्तिमय झाले होते. गावातील तरुण वर्गानी वारकऱ्यांसाठी अल्पोहार, चहा, फळाचे वाटप करण्यात आले. डोर्लेवाडी प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वतीने वारक-यांची मोफत आरोग्य तपासणी करून औषध व गोळ्याचे वाटप करण्यात आले. सकाळपासूनच ठिकठिकाणी रांगोळ्यांच्या पायघड्या आणि वारकऱ्यांसाठी विविध उप्रकम राबविण्यात आले होते. यावेळी कीर्तन भजनाच्या भक्तीमय वातावरणात अखंड डोर्लेवाडी नाहून निघाली.
पढंरपूरकडे निघालेल्या या पालखी सोहळ्यात हजारो वारकरी सहभागी झाले आहेत. कोणी चहा, कोणी नाश्ता तर काही नागरिकांनी वारक-यांसाठी निवासाची सोय करुन दिली. यावेळी विविध माध्यमातून डोर्लेवाडीकर वारकऱ्यांच्या सेवेसाठी झटत होते. झारगडवाडीच्या वेशीवर पालखी आल्यानंतर तेथील भजनी मंडळ, ग्रामस्थानीं पालखीचे जोरदार स्वागत केले. अहिल्यादेवी चौकामध्ये पालकी विसावली. यावेळी दर्शनासाठी भाविकांनी गर्दी केली होती.
दरम्यान, विसावा घेऊन झाल्यानंतर पालखी झारगडवाडी येथील गावठाण परिसरात दुपारी तीन वाजता अश्वाचे भव्य गोल रिंगण झाले. रिंगण पाहण्यासाठीहि भाविकांनी मोठी गर्दी केली होती. अश्वाचे रिंगण झाल्यांनंतर भाविकांनी आश्वाच्या टपाची माती कपाळी लावण्यासाठी लगबग उडाली होती. रिंगण झाल्यानंतर पालखी सोनगांव मार्गे इंदापूर तालुक्यातील तावशी या गावी मुक्कामी रवाना झाली.