-राहुलकुमार अवचट
यवत : प.पू. श्री. ज्ञानेश्वर हरी काटकर, प्रज्ञापुरी (कोल्हापूर) यांच्या प्रेरणेने व प.पू. श्री गोविंद वासुदेव रानडे (गुरुजी) कोल्हापूर यांच्या मार्गदर्शनात श्री साईबाबा पालखी सोहळा समिती, कराड आयोजित श्री क्षेत्र शिर्डी ते कराड पायी पालखी सोहळ्याचे चौफुला येथील श्री बोरमलनाथ मंदिर येथे मोठ्या उत्साहात स्वागत करण्यात आले.
यवत येथील श्री साई चरण सेवा मंडळ व परिसरातील साईभक्तांकडून पालखी स्वागतासाठी आकर्षक रांगोळी व फुलांच्या पायघड्या घालण्यात आल्या होत्या.
दत्तजयंती उत्सव निमित्ताने दरवर्षी पालखी सोहळा आयोजित केला जातो. पालखीचे हे 24 वे वर्ष असुन (दि. 29 नोव्हेंबर) रोजी श्री क्षेत्र शिर्डी वरून कराड कडे प्रस्थान केले होते. आज सकाळी ऊर्जा उद्योग समूह ( आंधळगाव ) येथे मुक्काम आटपून पालखीने सकाळी 8 च्या सुमारास दौंड तालुक्यात प्रवेश केला. गरदडे वस्ती येथे अल्पोहर करून सकाळी 11 च्या सुमारास पालखीचे बोरबलनाथ मंदिराच्या कमानी जवळ आगमन झाले. यावेळी मंदिराच्या प्रवेशद्वारावर गुलाब पुष्पांची उधळण करीत पालखीचे भव्य असे स्वागत करण्यात आले. यानंतर पालखीला आकर्षक फुलांची सजावट करुन श्री साईंची मध्यांन्ह आरती करण्यात आली व महाप्रसाद वाटप करण्यात आले.
यावर्षी पालखी सोहळ्यात कराड, वाठार किरोली, मसुर, पेठ नाका, कवठे महाकाळ यांस सातारा, कोल्हापूर, सांगली जिल्ह्यातील अनेक भक्त सहभागी झाले. अखंड श्वासावर चालणारा असा “साई साई हरे हरे, साई राम हरे हरे ” हा जप याबाबत पालखी सोहळा प्रमुख उद्यसिंह देसाई यांनी याचे महत्व साई भक्तांना सांगितले व पुढील वर्ष हे 25 वे वर्ष असल्याने यवत परिसरातील साई भक्तांनी श्री क्षेत्र शिर्डी ते यवत असा पालखी सोहळा आमच्याबरोबर करावा, अशी अपेक्षा व्यक्त केली.
काही काळ विश्रांती केल्यानंतर दुपारी तीनच्या सुमारास अखंड श्वासावर चालणारा असा “साई साई हरे हरे, साई राम हरे हरे ” हा जप करत पायी वारी करणारे साई भक्त कराड कडे मार्गस्थ झाले. आजचा पालखी मुक्काम सुपे येथे असून निरा, वाठार स्टेशन, कोरेगाव, रहिमतपूर, मसूर, कोपर्डे असे मुक्काम करत (दि. 13 डिसेंबर) रोजी पालखी कराड येथे पोहोचणार असून (दि.14) रोजी दत्त जयंती उत्सव साजरा केला जाणार असल्याची माहिती आयोजकांनी दिली.
यावेळी यवत येथील श्री साईचरण सेवा मंडळ, श्री शिवसाई मित्र मंडळ, श्री साईभक्त सेवा मंडळ, तांबेवाडी यांसह परिसरातील असंख्य साईभक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते.
पालखी बरोबर अचानक आले श्वान
श्री क्षेत्र शिर्डी येथून श्री साई पालखीचे प्रस्थान झाले आणि पालखी बरोबर श्री साईंच्या द्वारकामाई पासून एक श्वान अचानक पालखीत सहभागी झाले. अनेकांनाही ठराविक काळासाठी असेल असे वाटत होते, परंतु जसजसे पालखी सोहळा पुढे जात आहे तसतसे हे श्वान देखील पालखी बरोबरच चालत असून रस्त्याने येणाऱ्या गावात, शहरात गर्दी असून देखील हे श्वान पालखी सोडून कुठेही गेले नाही. रस्त्याने मिळेल ते खाणार, मिळेल ते पाणी पीत फक्त पालखी जवळच झोपणार असे हे श्वान पालखी बरोबर असल्याने साक्षात श्री साई या रूपात आले, अशी भावना साईभक्त व्यक्त करीत आहेत.