शिर्डी : शिर्डी-येथील श्री साईबाबा संस्थान विश्वस्त व्यवस्थेच्या वतीने नवीन वर्षाच्या स्वागतानिमित्त शिर्डी महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. दरम्यान श्री साईबाबांच्या दर्शनासाठी शिर्डीत होणारी संभाव्य गर्दी लक्षात घेऊन समाधी मंदिर शनिवार दिनांक ३१ डिसेंबर रोजी दर्शनास रात्रभर खुले ठेवण्यात येणार असल्याची माहिती संस्थांचे प्रमुख मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल जाधव यांनी दिली.
दरवर्षी नाताळ सुट्टी,चालू वर्षाचा निरोप, नवीन वर्षाचे स्वागत या निमित्त श्रींच्या दर्शनास शिर्डीत गर्दी होते येणाऱ्या सर्व भाविकांना श्रींच्या समाधीच्या दर्शनाचा लाभ मिळावा, गर्दीचे नियोजन योग्य रीतीने व्हावे या उद्देशाने दिनांक ३१ डिसेंबर रोजी श्रींचे समाधी मंदिर दर्शनासाठी रात्रभर खुले ठेवण्यात येणार आहे. ३१ डिसेंबर रोजी व दिनांक १ जानेवारी २०२३ रोजी पहाटेची काकड आरती होणार नाही.
जाधव म्हणाले, नववर्षाच्या सुट्टीच्या गर्दीमुळे शनिवार दिनांक २४ डिसेंबर ते रविवार दिनांक १ जानेवारी २०२३ असे नऊ दिवस वाहन पूजा बंद राहतील, परंतु नाताळ सुट्टी कालावधीत श्री साई सत्य व्रत पूजा, अभिषेक पूजा सुरू राहील याची श्री साई भक्तांनी नोंद घ्यावी.
मंदिर व परिसरात फटाके व वाद्य वाजवण्यास मनाई करण्यात आली आहे. सुरक्षिततेच्या दृष्टीने शिस्तीचे पालन करण्याचे आव्हान जाधव यांनी केले आहे.