यवत (पुणे) : यवत गावातील ग्रामदेवी व लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या श्री महालक्ष्मी मातेची आंबील गुगळीची सात काढत आज आषाढ यात्रेची सांगता करण्यात आली.
यवत व यवत परिसरातील अनेक भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या श्री महालक्ष्मी मातेच्या गुरु पौर्णिमेपासून अमावस्यापर्यंत गेल्या पंधरा दिवसापासून आषाढ यात्रेनिमित्त आखाड यात्रा दरवर्षी मोठ्या प्रमाणात साजरी होत असते. रविवार, मंगळवार, शुक्रवार या दिवशी आपला नवस फेडण्यासाठी अनेक भाविक या ठिकाणी येऊन आखाड यात्रा साजरी करतात. यावर्षी पाऊस मोठ्या प्रमाणात असल्याने आखाड यात्रेसाठी मोठ्या प्रमाणात गर्दी झाली होती.
यवत येथील आठवडे बाजार दर शुक्रवारी भरत असतो, परंतु गेली दोन आठवडे मंगळवारी व रविवारी देखील बाजार असल्याचे नागरिकांना जाणवत होते. यात्रा मोठ्या प्रमाणात भरल्याने अनेक भाविकांनी श्री महालक्ष्मी मातेचे दर्शन घेत नवस पूर्ण करण्यासाठी गोड गोड जेवणासह मांसाहारी जेवणाच्या पंगती बसलेल्या मंदिर परिसरात दिसून येत होत्या. यावेळी नारळ, ओटी साहित्य, पेढे यांसह अनेक लहान मोठे पाळणे यांसह खेळण्याचे व इतर दुकाने थाटली होती. यात्रा काळात श्री महालक्ष्मी माता नवरात्र उत्सव ट्रस्टच्या वतीने श्री महालक्ष्मी मातेची विविध रूपातील अलंकारिक पूजा करण्यात आली होती. तर मंदिरास आकर्षक विद्युत रोषणाई व फुलांची सजावट करण्यात आली होती.
आज अमावस्या असल्याने श्री गणपती मंदिर येथे आरती करून सातेची सुरुवात करण्यात आली. हनुमान मंदिर, शितळादेवी, म्हसोबा चौक, रायकर मळा, पुणे सोलापूर रस्त्याने श्री महालक्ष्मी मंदिर येथे देवीला साडी चोळी करत आरती करण्यात आली. यानंतर श्री काळभैरवनाथ मंदिरात जाऊन श्री काळभैरवनाथ व जोगेश्वरी यांना पोशाख करून आरती करण्यात आली. यावेळी दरवर्षीप्रमाणे देवीचे पारंपारिक पुजारी अशोक बाबा शेंडगे व गणेश शेंडगे यांनी आंबील गुगळीचा सडा टाकत धार्मिक कार्य केले. यावेळी पोतराज, देवीचे गोंधळी यांसह श्री महालक्ष्मी माता नवरात्र उत्सव ट्रस्टचे पदाधिकारी व समस्त ग्रामस्थ उपस्थित होते.