पुणे : पुणे जिल्ह्यातील आंबेगाव तालुक्यातील थोरांदळे येथील श्रद्धा भाऊसाहेब पोखरकर हिने मागील काही महिन्यात झालेल्या वन डे आणि टी-ट्वेंटी महिला क्रिकेट स्पर्धेत अप्रतिम कामगिरी केली. यामुळे रॉयल चॅलेंजर्स बंगळुर या संघाने आजपासून होणार्या महिला प्रिमीअर लीगसाठी श्रद्धाला सहभागी करून घेतले आहे.
भारतातील महिला प्रीमियर लीग या क्रिकेट स्पर्धेच्या यंदाच्या मोसमाला आजपासून सुरुवात होत आहे. ही स्पर्धा बंगळूर आणि दिल्ली या दोन ठिकाणी होणार आहेत. या स्पर्धेत मुंबई इंडियन्स दिल्ली कॅपिटल्स, गुजरात जायंट्स, रॉयल चॅलेंजर्स बंगळूर आणि युपी वॉरियर्स हे ५ संघ सहभागी होणार आहेत. यामधील रॉयल चॅलेंजर्स बंगळूर संघामध्ये पुणे जिल्ह्यातील आंबेगाव तालुक्यातील थोरांदळे येथील शेतकरी कुटुंबातील श्रद्धा पोखरकर हिची निवड झाली आहे.
श्रद्धाचे सर्वत्र कौतुक
श्रद्धाला लहानपणापासूनच क्रिकेटची आवड होती. थोरांदळे आणि रांजणी याठिकाणी शालेय शिक्षण पूर्ण केल्यानंतर अकरावी व बारावीचे शिक्षण आंबेगावातील मंचर याठिकाणी पूर्ण केले. पुढे कॉम्पुटर इंजिनियरच्या डीग्रीचे शिक्षण पुण्यात घेता घेता क्रिकेटचे धडेही गिरवले. श्रद्धा पोखरकर ही शेतकऱ्याची कन्या आज मोठ्या दिमाखाने क्रिकेटचे मैदान गाजवत असून रॉयल चॅलेंजर्स बंगळूर संघामध्ये समावेश झाल्याने परिसरातून तिचे भरभरून कौतुक केले जात आहे.
टी ट्वेंटी क्रिकेट स्पर्धेत चमकदार कामगि
सप्टेंबर-ऑक्टोबर महिन्यात टी ट्वेंटी क्रिकेट स्पर्धा पार पडली. या स्पर्धेत श्रद्धाने महाराष्ट्र महिला संघाकडून खेळताना कटक येथे टी ट्वेंटी क्रिकेट स्पर्धेत चमकदार कामगिरी केली होती. तसेच डिसेंबर आणि जानेवारी महिन्यात देखील झालेल्या वनडे क्रिकेट स्पर्धेमध्येही तिने चमकदार कामगिरी केली होती. या कामगिरीच्या जोरावर तिला रॉयल चॅलेंजर्स बंगळुर संघाने आपल्या संघात सहभागी करून घेतले आहे.
भारतीय महिला संघात खेळण्याचे माझे स्वप्न : श्रद्धा पोखरकर
मागील काही महिन्यात टी ट्वेंटी स्पर्धेत आणि वनडे स्पर्धेत केलेल्या कामगिरीमुळे माझी निवड रॉयल चॅलेंजर्स बंगळुर संघात झाली आहे. मात्र, मला इथपर्यंत थांबायचे नाही मला देशासाठी खेळायचे असून भारतीय महिला संघात खेळण्याचे माझे स्वप्न आहे. यासाठी मी दिवस रात्र सराव करणार आहे, असं श्रद्धा पोखरकर म्हणाली.